नवी मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या कक्ष-१च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा गुन्ह्यांची उकल झाली असून, यामधील साडेसात लाख रुपये किमतीचे २५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या टोळीने राज्यात इतरही अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.घरफोडीच्या घटनांना आळा घालण्याच्या अनुषंघाने गुन्हे शाखा पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. यादरम्यान काही सराईत गुन्हेगार कोपरखैरणे परिसरात येणार असल्याची माहिती कक्ष-१चे सहायक निरीक्षक अविनाश माने यांना मिळाली होती. यानुसार उपआयुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे यांनी तपासपथक तयार केले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक अविनाश माने, महेश माने, नितीन थोरात, सहायक उपनिरीक्षक थोरात, हवालदार रोहिदास पाटील, जितेंद्र गोसावी, दीपक पाटील, जितेंद्र पाटील यांच्या पथकाने कोपरखैरणे परिसरात सापळा रचला होता. या वेळी त्या ठिकाणी आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते गुन्हेगार असल्याचे उघड झाले. यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. गोरख बाबुराव म्हात्रे (३२), प्रमोद बाळू साबळे उर्फ भालचंद्र (२४), अशी त्यांची नावे आहेत.अटक केलेले दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून घरफोडीच्या दहा गुन्ह्यांची उकल झाल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनी सांगितले. या गुन्ह्यातील ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे २५० ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत.
घरफोडी करणारे अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई : दहा गुन्ह्यांची उकल; २५० ग्रॅम सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:55 AM