गृहनिर्माण संस्थेची बनवेगिरी

By admin | Published: August 3, 2015 03:25 AM2015-08-03T03:25:23+5:302015-08-03T03:25:23+5:30

कोपरखैरणेतील एका गृहनिर्माण संस्थेने नगररचना विभागाने दिलेल्या परवानगीला फाटा देत मंजुरीपेक्षा दुप्पट सदनिका बांधल्याचा धक्कादायक

Housing Development Agency | गृहनिर्माण संस्थेची बनवेगिरी

गृहनिर्माण संस्थेची बनवेगिरी

Next

कमलाकर कांबळे , नवी मुंबई
कोपरखैरणेतील एका गृहनिर्माण संस्थेने नगररचना विभागाने दिलेल्या परवानगीला फाटा देत मंजुरीपेक्षा दुप्पट सदनिका बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रारी करून सुध्दा महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थेच्या एका सदस्याने आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
सिडकोकडून लिजवर मिळालेल्या कोपरखैरणे सेक्टर १ येथील भूखंड क्रमांक ८७ वर ‘सेना सहकारी गृहनिर्माण संस्थे’ने सहा मजली निवासी इमारत बांधली आहे. मात्र ही इमारत उभारताना संबंधित संस्थेने सिडको व महापालिकेच्या सर्व नियमांना हरताळ फासल्याचे उघड झाले आहे. संस्थेचे एक सदस्य संजय मधुकर कोचरेकर यांनी माहितीच्या अधिकारातून संस्थेची ही बनवेगिरी उघडकीस आणली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने संस्थेला या भूखंडावर १0 निवासी सदनिका आणि २ व्यावसायिक गाळे बांधण्याची परवानगी दिली होती. मात्र संस्था आणि विकासकाने मंजूर मूळ नकाशात बदल करून २0 निवासी व ६ वाणिज्य युनिटचे बांधकाम केले आहे. त्याचबरोबर या इमारतीतील बहुतांशी सदनिकाधारकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी ओपन टेरेसवर पक्के किंवा कच्च्या स्वरूपाचे बांधकाम करून त्याचा रहिवासी वापर सुरू केला आहे. तर काहींनी फ्लॉवर बेडमध्ये अनधिकृत बांधकामे केली आहेत. या सर्व अतिक्रमणांवर कारवाई करावी, यासाठी कोचरेकर हे मागील दोन-अडीच वर्षांपासून महापालिकेच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. कोचरेकर यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयाने २५ आॅक्टोबर २0१२ रोजी अतिक्रमण करणाऱ्या सोसायटीतील १६ सदनिकाधारकांना एमआरटीपी अ‍ॅक्टअंतर्गत नोटिसा बजावल्या. मात्र तीन वर्षे झाली तरी या अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे याप्रकरणी सिडकोनेही संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. कारवाईसंदर्भात प्रशासनाकडून जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा आरोप करीत कोचरेकर यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे.

Web Title: Housing Development Agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.