सहा महिन्यांत घरभाडे २५ टक्क्यांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:52 AM2017-08-07T06:52:09+5:302017-08-07T06:52:09+5:30
बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे घर विक्रीला घरघर लागली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढली आहे. परंतु घरभाड्यात होणाऱ्या अनियंत्रित वाढीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची परवड सुरू आहे
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे घर विक्रीला घरघर लागली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढली आहे. परंतु घरभाड्यात होणाऱ्या अनियंत्रित वाढीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची परवड सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत घरभाड्यात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या अनियमित वाढीला आळा घालावा, अशी मागणी मध्यमवर्गीयांकडून केली जात आहे.
मागील काही वर्षांपासून रियल इस्टेट क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागत आहे. जमिनीच्या किमती गगनाला भिडल्याने बजेटमधील घरे कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घर खरेदीच्या स्वप्नांना खीळ बसली आहे. यातच गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेली नोटाबंदी या व्यवसायाच्या मुळावर बेतली आहे. एकूणच बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदीनंतर बांधकाम उद्योगात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. स्वघराच्या स्वप्नांना मुरड घालीत अनेकांनी भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मागील सहा-सात महिन्यांत भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. नेमका याचाच फायदा घेत घरमालक आणि दलालांनी घरभाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. ही वाढ वीस ते पंचवीस टक्केच्या घरात आहे.
सध्या सर्वाधिक घरभाडे वाशी विभागात आकारले जाते. येथे वन रूम किचनसाठी लोकेशननुसार सात ते चौदा हजार रुपये आकारले जातात. वन बीचएकेसाठी सोळा ते वीस हजार रुपये भाडे आकारले जाते. तर टू बीएचकेसाठी हा दर बावीस ते तीस हजार रुपये इतका आहे. मागील वर्षभरात या घरांच्या भाडेदरात सरासरी तीन ते चार हजार रुपयांची वाढ झाली आहे. विशेषत: गेल्या सहा-सात महिन्यांत यात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अकरा महिन्यांचा करार असतो. प्रत्येक अकरा महिन्यांनंतर साधारण आठ ते दहा टक्के भाडेवाढ करण्याचा अलिखित करार असतो. असे असतानाही या नियमाला फाटा देत घरभाड्यांत मनमानी पध्दतीने वाढ केली जात असल्याचे आढळून आले आहे. वाशीपाठोपाठ नेरूळ, सीबीडी, खारघर, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या भागातील घरभाडेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली व कामोठे या भागांत अन्य उपनगरांच्या तुलनेत घरभाडे कमी आहे. तर गाव व गावठाण भागात उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळी व इमारतींतून शहरी भागाच्या तुलनेत कमी घरभाडे आकारले जाते.
पगडी पद्धतीचा परिणाम
अलीकडच्या काळात मासिक घरभाडे देण्याऐवजी पगडी अर्थात हेवी डिपॉझिट ही संकल्पना अधिक रुजली आहे. यात गुंतवणूकदार घरमालकाला हेवी अर्थात अधिक डिपॉझिट देतात. घरमालकाबरोबर दोन ते तीन वर्षांचा करार केला जातो. कराराचा कालावधी संपल्यानंतर घरमालक हे डिपॉझिट गुंतवणूकदाराला परत करतो.
या कालावधीत सदर गुंतवणूकदार हे घर वाढीव भाडे दराने इतरांना देतो. यातून मिळणाºया घरभाड्यावर संपूर्ण अधिकार गुंतवणूकदाराचा असतो. त्यामुळे अधिकाधिक भाडे मिळावे, असाच या गुंतवणूकदाराचा प्रयत्न असतो. त्यामुळे घराचे भाडे अनियंत्रितपणे वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.