गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई

By कमलाकर कांबळे | Published: February 14, 2024 08:25 PM2024-02-14T20:25:38+5:302024-02-14T20:26:07+5:30

उपनिबंधकांनी संपूर्ण कार्यकारिणी केली बरखास्त : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

housing society office bearers barred from contesting elections for five years | गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई

गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १४ येथील न्यू कृष्णा को ऑप. हौसिंग सोसायटीची कार्यकारिणी अपात्र घोषीत करण्यात आली आहे. सिडकोच्या सहकारी संस्था उपनिबंधकांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील नियम आणि तरतुदीचे उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या कार्यकारिणीवर ठेवला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यकारिणी अपात्र घोषीत करण्याची नवी मुंबईतील ही पहिलीच घटना असल्याने उपनिबंधनकांच्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे नमूद अधिनियमातील तरतुदीनुसार संबधित सदस्यांना पुढील पाच वर्षे सोसायटीची निवडणूक लढविता येणार नाही.

या गृहनिर्माण संस्थेच्या सभासद रमा गुप्ता यांनी तपासणीसाठी बॅंक खात्याचा तपशील, सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापकीय बैठकीचा वृत्तांत तसेच इतर आवश्यक कागदपत्रे मिळावेत, अशी मागणी संस्थेकडे केली होती. मात्र अनेकदा पत्रव्यवहार करूनसुध्दा संस्थेच्या कार्यकारिणीकडून त्यांना कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ११६० चे कलम १५४ (ब) २३ (१) नुसार संस्थेच्या कार्यकारिणीवर कारवाई करावी, अशी मागणी लेखी अर्जाद्वारे उपनिबंधक कार्यालयाकडे केली होती. या अर्जाच्या अधारे उपनिबंधकांनी कार्यकारिणीला नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

दोन वेळा संधी देऊन बाजू मांडली नाही

यासंदर्भातील पहिल्या सुनावणीला गृहनिर्माण संस्थेचे वकील उपस्थित राहिले. लेखी म्हणणे मांडण्यासाठी त्यांनी मुदत देण्याची विनंती केली. त्यानुसार संस्थेला दोन वेळा संधी देण्यात आली. मात्र त्यानंतरसुद्धा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. याची गंभीर दखल घेत उपनिबंधक प्रताप पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रणव जॉय मुखर्जी, सचिव अस्मिता अतुल तेंडुलकर, खजिनदार कनवर दिप सिंग यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यात कुचराई दाखविल्याचा ठपका ठेवून सहकारी संस्था अधिनियमाचे कलम १५४ -ब ८ (१) (२) नुसार त्यांना अपात्र घोषित केले आहे.

Web Title: housing society office bearers barred from contesting elections for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.