लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांना हॉवरक्राफ्ट सेवा पुरविण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने प्रयत्न सुरू केले असून, याचाच एक भाग म्हणून वसई येथे हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण सुरू आहे.
हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्यासाठी सखोल अभ्यास करण्यात येत असून, या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रियेला वेग येईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गट सर्वेक्षण करत आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल व पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मुंबईतील भाऊचा धक्का येथील डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल येथून हॉवरक्राफ्ट सेवा वसई, नेरुळ, वाशी, बेलापूर या मार्गावर चालविण्याचा विचार सुरू आहे.या ठिकाणी असलेली खाडी लक्षात घेता येथे ही सेवा सुरू करणे सोपे तसेच सोयीचे होणार असल्यामुळेच येथे ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.समुद्री पर्यटनाला चालनामुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे समुद्री पर्यटनाला व क्रुझ शिपिंगसाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, त्यामुळे मुंबईत येणाºया लक्झरी क्रुझच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, तसेच मोठ्या संख्येने पर्यटक समुद्री पर्यटनाला जात आहेत. मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलची उभारणी करण्यात येत असून, या कामाला सध्या वेग आला आहे. पुढील सहा ते सात महिन्यांत हे काम पूर्ण होईल व त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली. जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसामुळे क्रुझ पर्यटन बंद असते. त्यानंतर, आॅक्टोबरपासून नवीन हंगाम सुरू होतो. त्यामुळे आॅक्टोबर, २०२० पासून पर्यटक या सेवेचा लाभ घेऊ शकतील, असे भाटिया यांनी सांगितले.हावरक्राफ्ट म्हणजे काय?हावरक्राफ्ट हे अशा प्रकारचे वाहन आहे, ज्याचा वापर पाण्यासह जमिनीवरही करता येतो. दलदलीतही ते सहज चालविता येते. रस्ते मार्गे वाढत जाणारी वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेता, आता जलपर्यटनाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठीच हावरक्राफ्ट सेवेचा वापर करण्यात येणार आहे. याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा अधिक आहे.