ओंकार करंबेळकर, मुंबई बालमजुरी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने नुकतेच बदल करण्याचे ठरविले आहे. या बदलांनुसार बालमजुरी करायला लावणाऱ्यांना ठोठावल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली गेली आहे. त्याचप्रमाणे, धोकादायक कामावर १८ वर्षांखालील मुलांना काम करण्यास सरसकट बंदी घालण्यात आली आहे. हे बदल जरी स्वागतार्ह असले तरी पारंपरिक घरगुती व्यवसायात १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास मुभा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे रोजी कॅबिनेटने स्वीकारलेल्या या बदलांवरती सध्या विविध अंगांनी चर्चा सुरू आहे.१४ वर्षांखालील मुलांना धोकादायक नसणाऱ्या आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा होत नसेल तर कौटुंबिक व्यवसायात मदत करता येणार आहे. त्याचप्रमाणे शाळा सांभाळून चित्रपट, जाहिरात क्षेत्रातही काम करता येणार आहे. या सर्व बदलांवरती तज्ज्ञांद्वारे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. याआधीही १४ वर्षांखालील मुले अशा व्यवसायांमध्ये, जाहिरात, चित्रपट यांमध्ये काम करत होतीच. पण आता असा का बदल केला गेला, असा प्रश्न विचारला जात आहे. या बदलामुळे त्याला केवळ कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. कित्येक वेळेस ज्या कामाच्या ठिकाणी छापे टाकले जात तेथील बालकामगार मालकाचे नातलगच असत, कित्येक वेळेस छापे टाकल्यावर मुलांजवळ दप्तरेही सापडली आहेत, अशा मुलांची नोंद जवळच्या शाळांमध्ये असून, त्यांची हजेरीही नोेंदविली जात असते, त्यामुळे अशा बालमजुरीला कायद्याचे संरक्षण प्राप्त होईल अशी भीती व्यक्त होत आहे.
बालमजुरीविरोधी कायद्यातील बदल कितपत योग्य?
By admin | Published: June 12, 2015 5:48 AM