पनवेल : युती होण्यापूर्वी एकमेकांच्या उरावर बसणारे सेना-भाजप एकत्र आले कसे? दोघेही पैसे आणि सत्तेसाठी लालची आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. कामोठे येथे गुरूवारी आयोजित मनसेच्या सभेत त्यांनी प्रथमच सेनेला लक्ष्य केले. मोदी हे एडॉल्फ हिटलरच्या पावलावर पाऊल टाकत असून, देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे. देशात लोकशाही स्थापित करायची की हुकूमशाही हे २०१९ ची निवडणूक ठरवेल. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
नोटाबंदी देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. विशेष म्हणजे नोटाबंदी होण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर शाखेच्या माध्यमातून प्रायव्हेट पार्ट्यांना सुमारे ३ लाख कोटी जुन्या नोटा बदलवून देण्यात आला. सर्व नोटा ऊर्जित पटेल यांच्या सह्यांच्या होत्या. हा आरोप काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत केला. त्या आरोपाचे भाजपने अद्याप खंडन केले नसल्याने नोटाबंदीत मोठा घोटाळा झाला आहे हे सिद्ध होत आहे. पुलवामा हल्ल्याच्या दिवशी सकाळीच शहा सांगतात की, २५० आतंकवादी हल्ल्यात मारले गेले. मात्र, हवाई दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत किती आतंकवादी मारले गेले हे सांगता येत नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे या हल्ल्याची माहिती शहा यांना कोणी दिली, ते हल्ला होत असलेल्या विमानात बसले होते काय? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.
या वेळी राज ठाकरे यांनी अनेक व्हिडीओ दाखवून भाजपची पोलखोल केली. मोदी यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतानाची गर्दी देशभरात दाखवण्यात आली. मात्र, ही गर्दी मोदींच्या लोकसभा अर्ज भरण्यासाठी जमलेल्या रॅलीची नव्हती तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेची असल्याचे राज ठाकरे यांनी उपस्थितांना दाखविले. याचप्रमाणे उत्तर प्रदेश येथील मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची परिस्थिती देखील राज यांनी व्हिडीओद्वारे दाखविली. मोदींनी दत्तक घेतलेल्या उत्तरप्रदेशमधील गावामध्ये अद्याप पिण्यासाठी पाणी नाही, गावात नाले नाहीत. रस्त्यावर आलेला पाणी विहिरीत जाऊन तेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. या व्हिडीओमध्ये गावातील रहिवासी गावातील समस्येसंदर्भात बोलताना दाखविले आहेत. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना मोदींनी खोटे इरादापत्र वाटप केले. अशा खोटारड्या पंतप्रधानांना सत्तेपासून दूर ठेवा.
काँग्रेसच्या योजनांचे नाव बदलून भाजपने योजना सुरू केल्या आणि त्या योजना पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. विशेष म्हणजे केवळ जाहिरातींवर मोदी सरकाराने ४५०० ते ५००० कोटी भाजपने खर्च केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या सभेला दहा हजारांपेक्षा जास्त गर्दी जमल्याचे पाहावयास मिळाले. सभेला मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, गोवर्धन पोलसानी,अक्षय काशिद आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.