नवी मुंबई : महानगरपालिकेसह सिडकोने किती प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली हे पाहिले पाहिजे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रोजगार उपलब्ध होणार, परंतु तो येथील नागरिकांना मिळविण्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले पाहिजे. प्रशिक्षणासाठी आतापासून ठोस नियोजन करण्याची गरज असल्याचे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी या विषयावरील परिषदेमध्ये मंदा म्हात्रे यांनी त्यांची भूमिका मांडली. दि. बा. पाटील यांनी आयुष्यभर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष केला. यामुळे विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, अशी प्रकल्पग्रस्तांची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले.
विमानतळामुळे रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. पण, उपलब्ध होणाऱ्या रोजगारासाठीचे कौशल्य येथील तरुणांमध्ये असले पाहिजे. कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले पाहिजे. यापूर्वी सिडको व महानगरपालिकेने किती प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तशीच स्थिती होऊ नये यासाठी कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली.
पर्यटनस्थळांवरही लक्ष हवे
विमानतळ परिसरातील विकासकामांबरोबर पर्यटनस्थळ विकासावरही लक्ष दिले पाहिजे. मरीनासारखे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याचे व इतर समाज उपयोगी कामे केली जात आहेत. अटल प्रतिभा कौशल्य केंद्राच्या माध्यमातून माजी खासदार विनय सहस्रबुद्धे व सर्वांनी एक चांगल्या परिषदेचे आयोजन केले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.