सिडकोचे घर कितीला मिळणार? किमती जाहीर न झाल्यामुळे ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:40 PM2024-10-17T14:40:37+5:302024-10-17T14:40:51+5:30
सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत.
नवी मुंबई : माझे पसंतीचे सिडको घर योजनेंतर्गत सिडकोने २६ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या घरांसाठी १२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मात्र, योजना पुस्तिकेत घरांच्या किमती नमूद नसल्याने ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तांत्रिक कारणास्तव घरांच्या किमती जाहीर करण्याचे राहून गेले आहे. पुढील आठवडाभरात प्रकल्पनिहाय घरांच्या किमती जाहीर केल्या जातील, असे सिडकोच्या संबंधित विभागाने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत.
१२ हजार ४०० ऑनलाइन अर्ज
योजनेतील घरांसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सिडकोच्या संबंधित विभागाने केला आहे. योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या चोवीस तासांत तब्बल १२ हजार ४०० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पन्नास टक्के घरे तळोजात
- पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. १३ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित १३ हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत.
- यातील सर्वाधिक म्हणजेच जवळपास पन्नास टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे.
- विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात बहुप्रतीक्षित वाशी, खारघर रेल्वे स्थानक परिसरातील घरांचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु, एकाही प्रकल्पातील घरांच्या किमती जाहीर झालेल्या नाहीत.