अस्तित्वासाठी किणेंनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
By admin | Published: November 18, 2016 03:01 AM2016-11-18T03:01:05+5:302016-11-18T03:01:05+5:30
बदललेल्या प्रभागरचनेमुळे धोक्यात आलेले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसचे गटनेते राजन किणे व त्यांच्या
कुमार बडदे / मुंब्रा
बदललेल्या प्रभागरचनेमुळे धोक्यात आलेले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसचे गटनेते राजन किणे व त्यांच्या सहकारी नगरसेविका रेश्मा पाटील यांच्यासह इतर दोन माजी नगरसेविकांनी मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे इतरही काही नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्य्रातून ठामपा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे आव्हान संपुष्टात येणार आहे.
महापौर निवडणुकीत केलेल्या गद्दारीमुळे ते राष्ट्रवादीच्या रडारवर होते. भविष्यात राष्ट्रवादीकडूनच आपले सर्जिकल स्ट्राइक म्हणून त्यांनी त्याच पक्षात प्रवेश करून आपला स्वार्थ साधल्याची राजकीय वर्तुळात सुरस चर्चा सुरू आहे.
विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून किणे यांनी ४५ हजार ८२१ मते मिळवून कडवी झुंज दिली होती. तेव्हापासून ते आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील राजकीय हाडवैर प्रसिद्ध होते. तसेच मागील सात वर्षांत किणे आणि आव्हाड यांनी अनेकदा एकमेकांवर वैयक्तिक जाहीर आरोप केले होते.
विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या मागील पाच निवडणुकांमध्ये कधी पक्षाच्या चिन्हावर, तर कधी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे किणे २०१२ मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. त्या निवडणुकीत ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती.
परंतु, त्यानंतरही त्यांच्याबरोबर असलेल्या राजकीय वैमनस्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करून ते निवडून येऊ नयेत, यासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. ही पार्श्वभूमी पाहता आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्य्रात पराभव होण्याची त्यांना भीती होती. यामुळेच ते राष्ट्रवादीच्या तंबूत शिरल्याची चर्चा रंगू लागली आहे.