बारावीच्या उत्तरपत्रिका दिसल्या बस स्टॉपजवळ; पोलिस ठाण्यात केल्या जमा, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 05:25 IST2025-03-07T05:25:28+5:302025-03-07T05:25:28+5:30
शिक्षक बळीराम शिंदे हे तपासलेल्या उत्तरपत्रिका पिशवीत घेऊन जात असताना गाडीवरून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर शिक्षकाने याबाबत मुंबई बोर्डाला कळवले असल्याचे समजते आहे.

बारावीच्या उत्तरपत्रिका दिसल्या बस स्टॉपजवळ; पोलिस ठाण्यात केल्या जमा, तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, कळंबोली : बारावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका कामोठे बस स्टाॅपजवळ गुरुवारी मनसे पदाधिकाऱ्यांना सापडल्या आहेत. या उत्तरपत्रिका कामोठे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या असून, पोलिस तसेच शिक्षण विभागाकडून याबाबत माहिती घेण्यात येत आहे.
२८ फेब्रुवारीला वाणिज्य शाखेतील बुककिपिंग आणि अकाउंटन्सी हा पेपर झाला. त्या पेपरमधील उत्तरपत्रिकेचा संच कामोठे बस स्टाॅपजवळ गुरुवारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘मनसे’च्या पदाधिकारी स्नेहल बागल कामोठे बस स्टाॅपजवळ आल्या असता एक उत्तरपत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली. कुतूहल म्हणून त्यांनी ती पाहिली असता बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आले.
बोर्डाला कळविली माहिती
शिक्षक बळीराम शिंदे हे तपासलेल्या उत्तरपत्रिका पिशवीत घेऊन जात असताना गाडीवरून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर शिक्षकाने याबाबत मुंबई बोर्डाला कळवले असल्याचे समजते आहे. पनवेल गटशिक्षणाधिकारी यांना कळविण्यात आल्याचे कामोठे पोलिसांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका संच कामोठे बस स्टाॅपजवळ सापडले आहेत. यामुळे शिक्षक तसेच शिक्षण विभागाची हलगर्जी उघड झाली आहे. बोर्डाकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही. - अदिती सोनार, महिला जिल्हाध्यक्ष, मनसे, रायगड.