स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त डीपीएस तलाव वाचविण्यासाठी रविवारी मानवी साखळी
By नारायण जाधव | Published: May 9, 2024 06:17 PM2024-05-09T18:17:37+5:302024-05-09T18:18:12+5:30
सकाळी ८ ते ९ या वेळेत ती होणार आहे.
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त, पर्यावरणप्रेमी संघटनांनी ११ मे रोजी डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या विनाशाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मूक मानवी साखळीचे नियोजन केले आहे. सकाळी ८ ते ९ या वेळेत ती होणार आहे.
कीटक, पक्ष्यांचे नैसर्गिक अन्न आणि हेच त्यांना नाकारले जाते ही या वर्षीच्या स्थलांतरित पक्षी दिनाची थीम असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अटींचे उल्लंघन करून डीपीएस फ्लेमिंगो तलावात भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी सिडको दोषी असल्याचे नॅटकनेक्टने मिळवलेल्या कागदपत्रांनी सिद्ध केले आहे. भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखला जाणार नाही या अटीवर नेरूळ येथील प्रवासी जलवाहतूक टर्मिनलसाठी पर्यावरण मंजुरी घेतली आहे. मात्र, कामे करताना वने व पर्यावरण मंत्रालयाने घातलेल्या अनेक अटींचे सिडकोने उल्लंघन केल्याचे कुमार म्हणाले.
शिवाय सिडकोनेच या अटींचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. तलावाच्या दक्षिण टोकावरील मुख्य जलवाहिनी जेट्टीच्या कामात गाडली गेली होती, असे नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटल प्रीझर्वेशन सोसायटीचे संदीप सरीन यांनी सांगितले. ही वाहिनी तातडीने सुरू करणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. तर सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्हज फोरमच्या अंजली अग्रवाल यांनी भरतीचा प्रवाह रोखल्याने फ्लेमिंगो अन्नाच्या शोधात भटकत असल्याचे म्हणाल्या. खारघर हिल अँड वेटलँड ग्रुपच्या ज्योती नाडकर्णी म्हणाल्या की, नागरी नियोजकांनी पाणथळ जागा आणि जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.
डीपीएस तलावात भरतीच्या पाण्याचा प्रवाह अडविल्यामुळेच १० पक्षी मरण पावल्याचे सरीन म्हणाले. पर्यावरणप्रेमींच्या दबावाखाली मुख्य अभियंता यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या पथकाने परिसराला भेट दिली. परंतु, तलावात पाणी येण्यासाठी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, असे नॅटकनेक्टने सांगितले.