सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : सुनेने हाकलल्याने उघड्यावर राहायची वेळ आलेल्या महिलेला अखेर माणुसकीने तारले आहे. ज्या ठिकाणी तात्पुरता आसरा म्हणून त्या राहिल्या त्याच परिसरातून त्यांना मदतीचा हात मिळू लागला आहे. इतकेच नव्हे तर, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या सूचनेनुसार, समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.मुलगा आणि सुनेचे भांडण मिटवण्यासाठी नेरुळला आलेल्या सासू तुळसाबाई व्हावळे यांना सुनेने घरातून हाकलून दिल्याने उघड्यावर राहायची वेळ आली आहे. सुनेने घराबाहेर काढल्याने त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनीदेखील तुळसाबाई यांना मदत करण्याचे समाजकल्याण विभागाला कळवले होते. त्यानुसार समाजकल्याण विभागाचे अधिकारी बलभीम शिंदे यांनी सोमवारी नेरूळमध्ये जाऊन तुळसाबाई यांची भेट घेतली. तसेच वाशीच्या शेल्टर हाउसमध्ये त्यांच्या निवासाची सोय केल्याचेही सांगितले.दरम्यान, सुनेने नाकारले तरी माणुसकीने तारल्याची भावना तुळसाबाई यांनी व्यक्त केली. आपण संकटात असताना गेल्या दीड महिन्यापासून ज्यांनी आसरा दिला त्यांच्या सोबतच पुढील काही दिवस काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. हलाखीचे जीवन जगणाºया व तिथेच भेट झाल्याने त्यांच्यावर जीव जडलेल्या एका महिलेने त्यांच्याविषयी आत्मीयता व्यक्त केली. नातवंडे व सुनेच्या ओढीने त्या नेरूळमध्ये आल्या व त्याच वेळी लॉकडाउन लागल्याने कुटुंबापासून ताटातूट झाल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले. यामुळे शिंदे यांनी त्यांच्या पती व मुलांसोबत संपर्क करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु तुळसाबाई यांच्याकडे कुटुंबातील कोणाचेही फोन नंबर नसल्याने तो होऊ शकला नाही.यामुळे परळी येथील त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन तुळसाबाई ह्या सुखरूप असल्याचे धनंजय मुंढे यांच्यामार्फत कळविले जाणार आहे. आपण अडचणीत असल्याचे समजताच मदतीसाठी पुढे येऊ लागलेल्यांना पाहून तुळसाबाई यांचे डोळे पाणावले होते.>नागरिक आले धावूनयुवा नेते वैभव नाईक, संदीप पाटील यांनी त्यांना गावी पाठविण्यासाठी लागणारी मदत पुरविण्याची तयारी दर्शवली आहे. तर परिसरातील नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या सूचनेनुसार, विजेंद्र म्हात्रे यांनी तुळसाबाई यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. बँक अधिकारी नितीन गंडी, प्रतील तांडेल, प्रदीप गवस यांनी अन्नधान्य पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याशिवाय इतरही अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यापैकी अनेकांनी लागेल ती मदत त्यांना देण्याची तयारी दर्शविली आहे.
सुनेने हाकलले, माणुसकीने तारले; धुळ्यातील महिलेसाठी मदतीचा ओघ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:44 AM