अज्ञात साथीच्या रोगाने शेकडो जनावरे दगावली
By Admin | Published: March 28, 2017 05:36 AM2017-03-28T05:36:25+5:302017-03-28T05:36:25+5:30
सुधागड तालुक्यातील परिसरात जनावरांच्या अज्ञात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. महिन्याभरात भार्जेवाडी, दिघेवाडी
विनोद भोईर / पाली
सुधागड तालुक्यातील परिसरात जनावरांच्या अज्ञात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. महिन्याभरात भार्जेवाडी, दिघेवाडी, आंबिवलीवाडी, म्हसेवाडी आदी गावांमध्ये जवळपास दीडशेहून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे शेतकरी व पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्याभरात भार्जेवाडी येथे शेतकऱ्यांची ६० गुरे, दिघेवाडी २०, म्हसेवाडी १५ , आंबिवलीवाडी २५ आदींसह तालुक्यातील अनेक गावातील दुभत्या गायी, म्हशी, बैल आदी मुकी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, मात्र याकडे पशुवैद्यकीय विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप शेतकरी आणि पशुपालकांनी के ला आहे.अनेक शेतकऱ्यांच्या अख्या दावणीच मोकळ्या झाल्या आहेत. अशा प्रकारे जनावरांच्या अचानक मृत्यूच्या घटनांमुळे सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. पशुपालक हाताशपणे मोकळ्या दावणीकडे पाहताना दिसत आहेत. पशुवैद्यकीय विभागासमोर एक आव्हान उभे राहिले. त्यामुळे वेळीच पशुविभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी व पशुपालकांकडून होत आहे. संबंधित वरिष्ठ तज्ज्ञांनी याकडे लक्ष केंद्रित करु न मृत्युमुखी पडणारे पशुधन वाचवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच पशुपालकांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
अचानक आलेल्या साथीच्या आजारात बळी गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुग्धोत्पादनावर आपली उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुढे काय? हा मोठा प्रश्न पडला आहे. पाय आखडून खाली बसणे, मान टाकणे, शेपूट न हलवणे व बसल्यानंतर न उठणे ही लक्षणे साथीच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांमध्ये आढळून आली असून कितीही उपचार केले तरी जनावरे तीन ते चार दिवसांत दगावतातच असे पशुपालकांनी सांगितले. साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व पशुधन वाचवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
पशुसंवर्धन विभागाकडे अधिकाऱ्यांची कमतरता
च्सुधागड तालुक्यात ५० हजारांहून अधिक पशुधन आहे. परंतु तालुक्यात केवळ ६ पशुसंवर्धन दवाखाने आहेत व एक पशुसंवर्धन विकास कार्यालय आहे. यामध्ये श्रेणी १ चे ३ दवाखाने, श्रेणी २ चे ३ दवाखाने आहेत. यामध्ये श्रेणी १ मधील जांभूळपाडा आणि चव्हाणवाडी येथील दवाखान्यातील पदे रिक्त असून याठिकाणी अतिरिक्त पदभार देण्यात आले आहेत.
पाली येथे असलेल्या दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी डॉ.सुनीता चौगुले यांच्याकडे कार्यभार आहे. श्रेणी २ मध्ये नांदगाव येथे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. खवली येथील दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक रोहिणी दाभोळकर यांच्याकडे कार्यभार आहे. तसेच वाघोशी येथे डॉ.एम.एच.मोकल यांच्याकडे कार्यभार आहे.
सुधागड तालुक्याच्या लोकसंख्येनुसार पशुसंवर्धन विभागाकडे अधिकाऱ्यांची कमतरता आहे यामुळेच गावोगावी अधिकारी पोहचण्यास असमर्थ ठरत आहेत. तालुक्यात असणारे दोन ते तीन अधिकारी हे गावोगावी जावून गुरांना लसीकरण करत असतात. तसेच दर सहा महिन्यांनी गुरांना लसीकरण करण्यात यावे याकरिता ग्रामपंचायतींना पत्र पाठवण्यात येत असते.
त्या पत्राची दाखल घेऊन ग्रामपंचायतीने गावातील गुरांना लसीकरण करावे याकरिता जनजागृती करावयाची असते मात्र याकडे ग्रामपंचायती देखील दुर्लक्ष करीत आहे. पर्यायी गावातील गुरांना रोगप्रतिबंधक लस टोचली जात नाही यामुळे गुरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.
सुधागड तालुक्यातील परिसरात जनावरांच्या अज्ञात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून तातडीने पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल पाठवून यावर योग्य उपाययोजना केली जाईल.
- बी.एन.निंबाळकर,
सुधागड-पाली तहसीलदार
दिघेवाडी गावातील २० गुरे अज्ञात साथीच्या रोगाने दगावली असून हा कोणता रोग आहे याची लवकरात लवकर दखल पशुसंवर्धन खात्याने घ्यावी.
- श्रीपत उतेकर, ग्रा.पं. सदस्य, नांदगाव