विकासकाकडून शेकडो ग्राहकांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:45 PM2019-07-15T23:45:33+5:302019-07-15T23:45:38+5:30
वेगवेगळ्या गृहप्रकल्पात ८०० हून अधिक ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
नवी मुंबई : वेगवेगळ्या गृहप्रकल्पात ८०० हून अधिक ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. नवी मुंबईसह पुणे परिसरात गृहप्रकल्प सुरू असल्याचे सांगून ग्राहकांकडून लाखो रुपये घेवून त्यांना घरांचा ताबा न देता फसवणूक झाली आहे. त्यामध्ये एकाच विकासकाचा सहभाग असल्याची बाब किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणली आहे.
अमरीत, अमृत, निसर्ग बाग अशा विविध नावाच्या गृहप्रकल्पात फसवणूक झालेली आहे. त्यामध्ये फसवणूक झालेले ८०० हून अधिक ग्राहक समोर आले असून तो आकडा अधिक वाढण्याची शक्यता किरीट सोमय्या यांनी वर्तवली आहे. त्यानुसार संबंधित विकासकाला तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. गृहप्रकल्पाच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी आपल्याला संपर्क साधल्यानंतर आपण संबंधित विकासकाची माहिती काढली असता, त्यामागे सचिन झेंडे नावाची व्यक्ती सूत्रधार असल्याचे समोर आल्याचेही त्यांनी ऐरोली येथे सांगितले. त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेतली होती. त्यानंतर यासंबंधीचा तपास गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. त्यानंतर रविवारी फसवणूक झालेल्या ग्राहकांसाठी ऐरोलीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनीही उपस्थित राहून लवकरच संबंधितांना अटक केली जाईल असे आश्वासन दिले. फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आलेला आहे. चौकशीत इतरही अनेक बाबी समोर येण्याची शक्यताही ग्राहकांकडून वर्तवली जात आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
>फसवणूक झालेले ८०० हून अधिक ग्राहक समोर आले असून आकडा वाढण्याची शक्यता किरीट सोमय्या यांनी वर्तवली आहे. विकासकाला अटक करण्याची मागणी केली आहे.