पनवेल पालिका क्षेत्रातील शेकडो गटारे उघडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:51 AM2019-07-30T01:51:22+5:302019-07-30T01:51:35+5:30
हद्दीचा वाद : विकासकामे रखडली
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. पालिकेच्या स्थापनेपासून अद्याप ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली गटारे त्यावरील झाकणे बसविण्यात आली नसल्याने पालिकेने महसुली गावात त्वरित गटारांवरील झाकणे बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ग्रामस्थांमार्फत प्रभाग कार्यालयात यासंदर्भात पत्रव्यवहार केल्यास, प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत भुयारी गटार विभागात पाठपुरावा करण्याच्या सूचना देतात. पनवेल महापालिका क्षेत्रातील समाविष्ट २९ गावांमध्ये सध्याच्या घडीला जवळ जवळ तीन हजारांपेक्षा जास्त गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. पावसाळ्यात उघड्या गटारामुळे अपघाताची शक्यता आहे. पालिकेच्या स्थापनेच्या अडीच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतींनी अशाप्रकारे भुयारी गटारे व गटारांवरील झाकणे बसविली आहेत. मात्र, त्यानंतर महापालिकेकडून दुर्लक्ष झाले. काही ठिकाणी हद्दीच्या वादावरून सिडकोने गावालगतच्या भागांकडे विकासकामे करण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात प्रभाग ‘अ’चे सभापती शत्रुघ्न काकडे यांनीही पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे पत्रव्यवहार करून संबंधित कामे त्वरित हाती घेण्याची मागणी केली आहे.