मयूर तांबडे / पनवेलकुठलीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता पनवेल परिसरात शेकडो बोगस डॉक्टरांनी बनावट पदवीच्या आधारे आपली दुकाने थाटली आहेत. पनवेलच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही वर्षांपासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर केव्हा कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा बडगा आरोग्य विभागाने उगारायला हवा, अशी मागणी अधिकृत डॉक्टरांची संघटना असलेल्या जनजागृती ग्राहक मंचाने केली आहे.पनवेल परिसरात सर्रासपणे बोगस डॉक्टर व्यवसाय करत आहेत, मात्र अधिकारी कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत. पनवेल परिसरात बाबूलाल पटेल (देवीचा पाडा), मिहीर मोंडल (देवीचा पाडा), मनोज बिस्वास (देवीचा पाडा), राजकुमार गौड (तोंडरे), राम बिलास यादव (तोंडरे) हे बोगस डॉक्टर असल्याची तक्र ार एका दक्ष नागरिकाने पनवेल पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पाठवला. पाचही डॉक्टरकडे अर्हता मान्यताप्राप्त नसल्याने ते महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय व्यवसाय करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश देण्यात आलेले आहेत. हे पत्र तालुका आरोग्य अधिकारी यांना १२ जानेवारी रोजी प्राप्त झालेले आहे. मात्र १५ दिवस उलटून गेले तरी यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. यातील काही परिसर महापालिका परिसरात येत आहे तर काही ग्रामीण भाग असल्याने कारवाई करताना अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.महापालिका व ग्रामपंचायतीच्या हद्दीच्या वादात सामान्य माणसाला बोगस डॉक्टरांकडे उपचार घ्यावे लागत आहे. कोणालाही संशय येऊ नये, याकरिता पनवेलमधील बोगस डॉक्टरांनी अन्य डॉक्टरांच्या पदवीचे फोटोग्रॉफ काढून त्याच्या नावाच्या जागी स्वत:चे नाव टाकले आहे. त्यामुळे असे बोगस डॉक्टर वर्षानुवर्षे परिसरात राहून लाखो रु पये कमावत आहेत व त्यामुळे ते कोणाच्याही नजरेत येत नाहीत. तालुक्यातील आदिवासी वाड्यापाड्यांवर या डॉक्टरांचे फिरते दवाखानेही सुरू आहेत. माफक फी आणि झटपट आराम हा फंडा अनेक डॉक्टर राबवत असल्यामुळे आदिवासी, गोरगरीब रु ग्णांचा कल याच डॉक्टरांकडे असतो. मात्र या डॉक्टरांकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी किंवा ज्ञान नसल्याने त्यांचे उपचार रु ग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अनेकदा आरोग्य प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्र ारीही दाखल करण्यात आल्या आहेत. बहुतांशी बोगस डॉक्टर आपल्या दवाखान्यावर कोणत्याही प्रकारचा फलक लावत नाहीत. तसेच घरोघरी जाऊन उपचार करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना अडथळे येतात. महाराष्ट्रात कोठेही अॅलोपॅथीचा वैद्यकीय व्यवसाय करावयाचा झाल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमाणपत्र आवश्यक असते. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी या प्रकारच्या वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना संबंधित कौन्सिलकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. परंतु अशा प्रकारचे कोणतेही प्रमाणपत्र नसताना अनेक खेड्यांमध्ये बोगस डॉक्टर्स व्यवसाय करीत आहेत. यातील अनेक डॉक्टर्स असाध्य रोगावर खात्रीलायक इलाज करणारे आहेत. एखादा दवाखाना सुरू करताना कोणत्याही प्रकारची अधिकृत पदवी न घेताच नामफलकावर बीएचएमएस, एमबीबीएस आदी पदवी घेतल्याचे लिहिले जाते. ग्रामीण भागात एमबीबीएस किंवा यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले डॉक्टर काम करण्यास राजी होत नाहीत. त्यामुळे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे.
पनवेलमध्ये शेकडो ‘मुन्नाभाई’
By admin | Published: January 28, 2017 3:07 AM