शेकडो समाजदूत मंत्रालयावर धडकणार! पुणे-मुंबई लाँच मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 06:42 PM2023-08-15T18:42:03+5:302023-08-15T18:42:14+5:30
राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत.
पनवेल : मागील 9 वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याठिकाणी समाजदूत म्हणून कार्यरत असणाऱ्या शेकडो समजदूतांनी आपल्या समावेशनासाठी पुणे ते मुंबई (मंत्रालय ) असा लाँच मार्च दि.9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त सुरु केला आहे. दि.15 रोजी शेकडो समाजदुतांचा लाँच मार्च पनवेलमध्ये दाखल झाला होता.
राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत. महागाई गगनाला भिडत असताना मागील 9 वर्षात एकही रुपयाची पगारवाढ या समजदूतांना मिळाली नाही.शासनाने मागविलेल्या अहवालात या समजदूतांचे कायमस्वरूपी सामावेश करण्यास हरकत नसल्याचा अहवाल सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाला आहे मात्र तरी देखील काहीच निर्णय होत नसल्याने संतप्त समजदूतांनी पुणे येथून लाँच मार्चला सुरुवात केली आहे. सहा दिवस उलटले तरी अद्याप शासनाच्या प्रतिनिधींनी या समजदूतांची भेट घेतलेली नाही.
या लाँच मार्चमध्ये जवळपास 175 समाजदूत सहभागी झाले आहेत.सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची देखील या समजदूतांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. मात्र केवळ आश्वासनावर समजदूतांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी आम्ही आझाद मैदानात देखील धरणे दिले होते, मात्र आमच्या मागणीची दखल घेतली नाही. याकरिताच शेवटचा पर्याय म्हणून आम्ही लॉंग मार्च काढून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले असल्याचे समजदूतांच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.
साडेबारा हजारात कसे जगायचे?
समाजदूत म्हणून अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो. यामध्येच आमचा निम्मा पगार खर्ची होतो. त्यामुळे साडेबारा हजारात कसे जगायचे, हे तुम्हीच सांगा साहेब? असा प्रश्न हे समाजदूत उपस्थित करीत आहेत.