मधुकर ठाकूर
उरण : शिवडी- न्हावा सेतूच्या (अटल सेतू ) उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मागील दहा दिवसांपासून उरण, पनवेल , नवीमुंबई परिसरातील बंद करण्यात आलेल्या शेकडो क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट सोमवारपासून (१५) सुरू करण्यात आले आहेत.यामुळे क्रशर-दगडखाण आणि बांधकाम व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.मात्र क्रशर-दगडखाणी पुन्हा धूर ओकू लागल्याने परिसरातील हवेतील प्रदुषणाचा स्तर लागलीच वाढला आहे . अटल सेतूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने उरण-पनवेल-बेलापुर दरम्यान रस्ते, राष्ट्रीय महामार्गावरील जासई, गव्हाण, बंबावीपाडा, कुंडेवहाळ,ओवळे ग्रामपंचायत, सिडकोच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रशर- दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट ६ ते १३ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे सक्तीचे आदेश दिले होते.तसेच परिसरात धुळ फैलावत प्रदुषणाला कारणीभूत ठरत असलेल्या क्रशर- दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट यांचा विद्युत पुरवठाच बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.यामुळे मागील दहा दिवसांपासून शेकडोंच्या संख्येने क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट बंद ठेवण्यात आले होते. मागील दहा दिवसांपासून दररोज परिसरात प्रचंड प्रमाणात प्रदुषण फैलावणाऱ्या क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांटची धडधड थांबल्यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण प्रमाणापेक्षाही कमी झाले होते.
कधी नव्हे तर प्रदुषणाचा आयक्यूए स्तर १०० पर्यंत खाली आला होता.तसेच बंद करण्यात आलेल्या क्रशर- दगडखाणी, डांबरप्लांट, रेडीमिक्स प्लांटमुळे बांधकामासाठी खडी,दगड,ग्रीट आदी साहित्य मिळेनासे झाले होते.परिणामी उरण, पनवेल,नवीमुंबई परिसरातील बांधकाम व्यवसायही ठप्प झाला होता. या सक्तीच्या बंदमुळे मात्र संबंधित व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील दहा दिवसांपासून उरण, पनवेल , नवीमुंबई परिसरातील बंद करण्यात आलेल्या शेकडो क्रशर- दगडखाणी, डांबर, रेडीमिक्स प्लांट जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर सोमवारपासून (१५)सुरू पुन्हा एकदा सुरू करण्यात आले असल्याची माहिती श्री कान्होबा दगडखाण व क्रशर चालक-मालक संस्थेचे अध्यक्ष सुनील भोईर यांनी दिली.
सोमवारपासून क्रशर-दगडखाणींची धडधड पुन्हा सुरू झाली आहे.उरण-पनवेल परिसरातील क्रशर-दगडखाणी,डांबर, रेडीमिक्स प्लांट पुन्हा धूर ओकू लागल्याने परिसरातील प्रदुषणाचा आयक्यूए स्तर लागलीच २५० ते ३०० पर्यंत वाढला आहे.बांधकाम व्यावसायिकांची समस्या मिटली असली तरी मात्र परिसरातील प्रचंड प्रमाणात वाढत्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.