कळंबोली : शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका हेमलता गोवारी सध्या मावळमधील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्यासह परिसरातील नागरी समस्या जाणून घेण्यासाठी गाठीभेटी घेताना दिसत आहेत, तर त्यांचे पती रवी गोवारी भाजपचा प्रचार करताना दिसत आहेत. एकाच घरातील दोन व्यक्ती दोन विरोधी पक्षांचा प्रचार करताना दिसत असल्याने परिसरात चर्चेचा विषय बनले आहेत.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत कामोठे वसाहतीत हेमलता गोवारी आणि शीला भगत या दोनच नगरसेविका शेकापकडून निवडून आल्या. बाकी उमेदवारांचा पराभव झाल्याने या ठिकाणी भाजपने वर्चस्व सिद्ध केल्याचे दिसून आले. कामोठे परिसराचे नेतृत्व के.के.म्हात्रे यांच्याकडे होते. त्यांनाही या ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर म्हात्रे आणि त्यांचे समर्थक रवी गोवारी व भाऊ भगत या दोन नगरसेविकांच्या पतींनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
रविवारी पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा यांनी कळंबोली, कामोठेतील रहिवाशांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत हेमलता गोवारी दिसून आल्या. गोवारी यांनी सुनेत्रा यांच्यासोबत परिसरातील सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आघाडीचे उमेदवार असलेले पार्थ या समस्या नक्कीच सोडवतील, असे आश्वासन रहिवाशांना दिले. पती रवी गोवारी भाजपच्या मेळाव्यांत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत तर पत्नी हेमलता आघाडीच्या उमेदवारासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
शेतकरी कामगार पक्षाचीच नगरसेविका असल्याने साहजिकच आघाडीचा धर्म पाळणार आहे. कोणी कोणत्या पक्षात जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला माझे पती रवी सुद्धा अपवाद ठरू नयेत. भाजप प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.- हेमलता गोवारी, नगरसेविका, पनवेल महापालिका