हुश्श…! सारेच विद्यार्थी झाले पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:59 PM2021-04-07T23:59:19+5:302021-04-07T23:59:32+5:30
पनवेल पालिका क्षेत्रातील १ लाखाहून अधिक मुले गेली पुढच्या वर्गात
कळंबोली : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या आहेत. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, महापालिका शाळा, खासगी संस्था शाळेतील १ लाख ५२ हजार ८३ विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील शैक्षणिक सत्रात सरळ प्रवेश दिला जाणार आहे.
गतवर्षी कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद झाल्या होत्या. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते. यंदाही तीच परिस्थिती उद्भवली आहे. याही वर्षी आधीच शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले तर तेही काही काळ सुरू राहिले. पालकांची मनस्थिती तयार होईपर्यंत दुसऱ्या कोरोनाची लाट आली.
त्यामुळे राज्य सरकारने यंदाही पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास केले आहे. यंदा शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन त्याचबरोबर जानेवारी ते मार्चपर्यंत ऑफलाइन अशा दोन्ही पध्दतीने शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल तालुक्यात ५५५ शाळा आहेत. यात जिल्हा परीक्षा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित व इंग्लिश स्कूल या शाळांचा समावेश होतो. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत १ लाख ५२ हजार ८३ विद्यार्थी संख्या आहे. यामुळे आता हे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.
तालुक्यातील शाळा व पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी
शाळा संख्या विद्यार्थी संख्या
जिल्हा परिषद २४८ २१,६५६
महापालिका शाळा ०११ ०१,९४१
खासगी शाळा २९६ १,२८,४८६
एकूण ५५५ १,५२,०८३
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. मुलांच्या मूल्यमापनामध्ये अडचण असली तरी, शासनाकडून परीक्षा रद्द करून पास करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच निर्णय आहे. - बालाजी घुमे, शिक्षणतज्ज्ञ
ऑनलाइन शिक्षण तसेच स्वाध्यायसारखा उपक्रम असेल त्यात अनेक दुर्गम भागातील मुले सहभागी झाली नव्हती. वाढता कोरोना असल्याने त्यांची काळजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. पुढील वर्षी सुरुवातीला मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाचा मात्र आढावा घ्यावा लागेल.
- महेश खामकर, गटशिक्षणाधिकारी, पनवेल