रुंदीकरणात झोपड्यांचा अडथळा
By admin | Published: November 10, 2015 12:22 AM2015-11-10T00:22:01+5:302015-11-10T00:22:01+5:30
महामार्ग रुंदीकरणाकरिता कळंबोली सर्कल ते पळस्पे फाटा दरम्यान अतिक्रमणांना रस्ते विकास महामंडळाने नोटिसा बजावल्या आहेत
पनवेल : महामार्ग रुंदीकरणाकरिता कळंबोली सर्कल ते पळस्पे फाटा दरम्यान अतिक्रमणांना रस्ते विकास महामंडळाने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र पनवेल शहरातील महामार्गालगत ज्या व्यावसायिकांनी झोपडीवजा दुकाने थाटली आहेत, त्यांनी या कारवाईला विरोध दर्शवला आहे. आधी पुनर्वसन करा... मगच कारवाई करा... अशी भूमिका झोपडपट्टी रहिवासी संघाने घेतली आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाला महामार्ग रुंदीकरणात अडचणी येण्याची शक्यता आहे.
पनवेल पालिका आणि सिडकोहद्दीत असलेल्या झोपड्यांमुळे काही प्रकल्प आणि विकासकामात अडथळा निर्माण होत आहे. तत्कालीन नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या काळात ‘झोपडपट्टीमुक्त पनवेल’ हा संकल्प मांडण्यात आला. प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष असताना त्यांनी शहरातील झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे करून पुनर्वसनासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र सिडकोकडून भूखंड न मिळाल्याने आजतागायत पुनर्वसन झाले नाही.
मोक्याच्या जागेवर असलेल्या झोपड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कारणासाठी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. पनवेल बसस्थानकाजवळील झोपड्यांमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांची दुकाने गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. तसेच या ठिकाणी खाद्यपदार्थ, गॅरेज, मोबाइल यासारखी दुकाने सुरू आहेत. रुंदीकरणासाठी रस्ते विकास महामंडळाने येथील झोपडीधारकांना नोटिसा बजावल्या होत्या, मात्र त्यास विरोध दर्शवण्यात आला आहे. आम्ही गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून आहोत. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीकरिता पत्रव्यवहार केले आहेत. हा अर्ज चौकशीकरिता तहसीलदारांकडे वर्ग केला होता. त्यानुसार तहसीलदारांनी सर्वेक्षण करून या जागेवर राहण्याकरिता परवानगी देण्यास हरकत नसल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केल्याचे निवेदन झोपडपट्टीवासीयांनी दिले आहे.