कळंबोलीत कारवाईनंतरही ‘झोपड्या जैसे थे’; भूखंडावर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:14 AM2020-02-05T00:14:02+5:302020-02-05T00:14:24+5:30
डेब्रिजही टाकण्यात येत असल्याने नाराजी
कळंबोली : कळंबोली परिसरातील सिडको कार्यालयाजवळ असलेल्या राखीव भूखंडावर असलेल्या झोपड्या काही दिवसांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. यासाठी मोठा लवाजमा करण्यात आला होता. मात्र, अतिक्रमणविरोधी पथकाची पाठ फिरवताच परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. भूखंडावर पुन्हा झोपड्या उभ्या राहिल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच सिडकोने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्याचा संकल्प केला. त्यानुसार प्रत्येक वसाहतीत तारखांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी अगोदरच नवी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त मागविण्यात आला होता. कळंबोलीत सिडकोचे अनधिकृत बांधकाम विरोधी पथकासह कामगार, जेसीबी, ट्रक त्याचबरोबर इतर मोठा लवाजमा दाखल होऊन करवाई करण्यात आली. सिडको कार्यालयाजवळ असलेल्या बीयूडीपीच्या घरांसाठी राखीव भूखंड आहे. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्यात आल्या होत्या.
सिडकोने तारेचे कुंपण घालूनही त्या झोपड्या तिथेच होत्या. येथील १५० झोपड्यांवर अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने नुकतीच कारवाई केली; परंतु त्याअगोदरच झोपडपट्टीवाल्यांनी सर्व साहित्य, बांबू त्याचबरोबर चटई काढून घेतल्या होत्या. सिडकोचे पथक निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा झोपड्या बांधण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सिडकोने इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासह केलेल्या कारवाईचा काहीच फायदा झाला नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
तारेचे कुंपण नावालाच
सिडकोने कळंबोलीतील आपल्या मालकीच्या भूखंडांना तारांचे कुंपण घातले आहेत. सिमेंटचे बीम रोवून त्यावर तारा लावण्यात आल्या आहेत. त्यासाठी लाखांचा खर्चही केला आहे; परंतु तारा तोडून आतमध्ये झोपड्या बांधल्या जात आहेत, याशिवाय डेब्रिजही या ठिकाणी टाकले जात आहे.