मास्कसह स्वच्छतेमुळे साथरोग नियंत्रणात, रुग्णालयातील रांगा झाल्या कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 01:40 AM2020-12-06T01:40:03+5:302020-12-06T01:41:52+5:30
health News : कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे मनपाच्या रुग्णालयातील रुग्णसंख्याही १,५०० वरून ५०० वर आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात येऊ लागले आहे. घराबाहेर वावरताना मास्कच वापर केला जात आहे. सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून, हात वारंवार धुतले जात आहेत. पालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे व पानटपऱ्यांवर बंधने घातल्यामुळे थुंकण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
आहारामध्येही बदल झाल असून, या सर्व उपाययोजनांचा परिणाम आरोग्य सुधारण्यासाठी होऊ लागला आहे. कोरोनापूर्वी खासगी व सरकारी रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला व इतर किरकोळ आजार झालेले रुग्ण उपचारासाठी रांगेत थांबलेले चित्र पाहावयास मिळत होते, परंतु सद्यस्थितीमध्ये ही संख्या रोडावली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पूर्वी १,२०० ते १,५०० रुग्ण प्रतिदिन उपचारासाठी येत होते. आता ही संख्या ५०० वर आली आहे. इतर रुग्णालयातही हीच स्थिती आहे.
मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळा
मास्कचा वापर व स्वच्छता यामुळे अतिसार, डांग्या खोकला व इतर आजारांना आळा घातला आहे. विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने ताप व इतर अजारही थांबल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोरोना काळात लागलेली स्वच्छतेची सवय व आरोग्याविषयी जागरुकता नागरिकांनी कायम ठेवावी असे आवाहन ही डाॅक्टरांनी केले आहे.
विषाणूजन्य आजार
दरवर्षी साथीचे आजार कमी करण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागते. धुरीकरण, औषध फवारणी करावी लागते. आता पालिकेबरोबच सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चाने फवारणी करू लागले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव कमी झाला असून यावर्षी डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे.
नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढू लागली आहे. मास्कचा वापर, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झाले
आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून लोकांच्या सवयीमध्ये सकारात्मक बदल झाले असून त्यामुळे सर्वच प्रकारच्या ओपीडीमधील संख्या कमी झाली आहे.
- डॉ. प्रशांत जवादे , आरोग्य अधिकारी, महानगरपालिका