लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वैयक्तिक जीवनात मला लोणावळ्याचे पर्यटन आवडते. कारण तेथे माझे घरही आहे, असे गुपित सांगत ऐतिहासिक किल्ले, पुरातन मंदिरे, विस्तीर्ण जंगल आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे यामुळे आपला महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण भारतात परिपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट असून येत्या काळात त्यात अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
लोकमतने नवी मुंबई आणि पनवेल शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा नवी मुंबई गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. वाशी सेक्टर १९ डी येथील आय लिफ बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोढा बोलत होते. मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी लोढा यांना बोलते केले. महिला आणि बालकल्याण विभागाशी संबंधित प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, या विषयावर खूप काम करण्याची गरज आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास एक लाख अंगणवाड्या आहेत. तसेच अनेक महिला बाल सुधारगृहे आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजही महिलांचे प्रमाण जवळपास ४८ टक्के इतके आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण विभागात खूप काम करण्याची गरज आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. ८ मार्च रोजीच्या महिलादिनी राज्य शासनाकडून जाहीर होणारे महिला धोरण सर्व महिलांना दिलासा देणारे असेल, असा विश्वासही लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.
सामाजिक बांधिलकीही महत्त्वाचीवृत्तपत्राचा खप वाढविणे किंवा पैसा कमाविणे हे लोकमतचे धोरण कधीच नव्हते. लोकमतने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. भूकंपग्रस्तांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील सैनिकांच्या परिवारापर्यंत पोहोचून त्यांचे सांत्वन करण्याचे काम लोकमतने केले आहे. सैनिकांच्या पाल्यांसाठी राज्यात चार ठिकाणी वसतीगृहे उभारली आहेत. समाजात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची आमची भूमिका आहे. त्यातूनच सरपंच ते आमदार आणि खासदार यांचा प्रत्येक वर्षी सन्मान करण्यात येतो. वर्षभरात अशा प्रकारचे जवळपास एक हजार सोहळे लोकमतच्या माध्यमातून आयोजित केले जातात, अशी माहिती लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी यावेळी दिली.
५१ मान्यवरांचा विशेष पुरस्काराने सत्कार या कार्यक्रमानिमित्त नवी मुंबई आणि पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या ५१ मान्यवरांचा यावेळी विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेश नार्वेकर, सहपोलिस आयुक्त संजय मोहिते, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, त्याचप्रमाणे सीआयडी फेम सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, आदिती सारंगधर तसेच ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्री दिव्या सुभाष आणि लोकमतचे सहउपाध्यक्ष विजय शुक्ला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले.