मी चेहरे वाचतो, कोण बरोबर राहणार आहे, जाणार आहे... बरोबर कळतं; राज ठाकरेंची मिष्किल टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:29 PM2023-02-27T12:29:40+5:302023-02-27T12:30:09+5:30
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे.
नवी मुंबई-
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. ठाकरे काय वाचतात? असा मुलाखतीचा विषय होता. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी एका शब्दात मी चेहरे वाचतो, असं म्हटलं आणि उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला.
पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी ठाकरे नेमकं काय वाचतात? असं मुलाखतकारानं राज ठाकरेंना विचारलं असता राज यांनी 'चेहरे' असं पटकन उत्तर दिलं. त्यानंतर सभागृहात टाळ्यां वाजल्या. "दररोज माणसंच इतकी भेटायला येतात की चेहरे पटकन वाचता येतात. मी माणसं वाचतो. कोण बरोबर राहणार आहे आणि कोण जाणार आहे हे बरोबर कळतं", अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.
दादा कोंडकेंचं 'एकटा जीव' आवडीचं पुस्तक
राज ठाकरे यांनी यावेळी त्यांचं आवडीचं पुस्तक देखील सांगितलं. "खरंतर बरीच पुस्तकं खूप जवळची आहेत. पण दादा कोंडके यांच्यावरचं 'एकटा जीव' हे पुस्तक खूप छान आहे. ते कुठूनही वाचता येतं. कुठूनही तुम्ही ते वाचायला सुरुवात केली की त्यात रमून जाता", असं राज ठाकरे म्हणाले.
फिक्शन, लव्हस्टोरी वाचत नाही
फिक्शन आणि लव्हस्टोरी अशी पुस्तकं मी काही वाचत नाही. दुसरा प्रेम करतोय ते आपण काय वाचायचं. त्याचं तो बघेल ना, असं म्हणत राज ठाकरे यांनी फिक्शन, लव्हस्टोरी वाचण्यात अजिबात रस नसल्याचं म्हटलं. पूर्वीचे लेखक समाज कसा शहाणा होईल यासाठी लिहायचे, पण आताचे लेखक आपण किती शहाणे आहोत ते दाखवण्यसाठी लिहितात, असंही राज ठाकरे म्हणाले.