नैनासाठी आता पूर्ण वेळ मिळणार आयएएस अधिकारी; सिडकोचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 07:33 AM2021-01-25T07:33:52+5:302021-01-25T07:33:52+5:30
विकासाला गती देण्यासाठी सकारात्मक पाऊल
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : मुंबईपेक्षा तिप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना क्षेत्राचा विकास मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे नैनाच्या विकासाला गती देण्यासाठी सिडकोने आता कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नैना क्षेत्राच्या नियोजनासाठी पूर्ण वेळ आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. राज्य सरकारच्या संमतीने यासंदर्भात लवकरच कार्यवाही केली जाईल, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ‘लोकमत’ला स्पष्ट केले आहे.
नैना क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारच्या मान्यतेने सहा मॉडेल तयार केले आहेत. यापैकी कोणत्याही एका मॉडेलचा स्वीकार करण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना दिले गेले आहे. नगररचना परियोजना अर्थात टीपीएस योजना नैनाच्या विकासासाठी पूरक ठरणार आहे. त्यादृष्टीने सिडकोने एकूण ११ टीपीएस प्रस्तावित केल्या असून त्यापैकी तीन टीपीएसला शासनाची मंजुरीही मिळाली आहे. तर पहिल्या टीपीएस योजनेची अंमलबजावणीही सुरू केली आहे. परंतु नैनाचे क्षेत्र विस्तीर्ण आहे. दोन टप्प्यात १७५ गावे विकासाच्या टप्प्यात आणली जाणार आहेत. याअंतर्गत एकूण ११ स्मार्ट शहरे वसविण्याची योजना आहे. मात्र सध्या हे काम कूर्मगतीने सुरू आहे. कामाचा वेग असाच राहिला तर नैना प्रकल्पाची योजना रसातळाला जाण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळेच या कामाला गती देण्याचा निर्णय संजय मुखर्जी यांनी घेतला आहे. सध्या नैनाचा क्षेत्राचा कार्यभार सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांच्याकडे आहे.
त्याशिवाय त्यांच्यावर सिडकोचे महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि विभागांची जबाबदारीसुध्दा सोपविली आहे. भविष्यात नैना क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र अधिकारी असणे गरजेचे असल्याचे मत संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. त्यानुसार नैनाच्या नियोजनासाठी पूर्ण वेळ आयएएस अधिकारी नियुक्त करण्याची योजना आहे. राज्य सरकारच्या मान्यतेने यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले. सिडको महामंडळात सध्या चार आयएएस अधिकारी आहेत. यात स्वत: व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक एस.एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांचा समावेश आहे. यात आणखी एका आयएएस अधिकाऱ्याची भर पडणार आहे. त्याशिवाय सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून शशिकांत महावरकर हे काम पाहत आहेत. त्यामुळे येत्या काळात पाच आयएएस आणि एक आयपीएस अशा सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची टीम सिडकोत पाहावयास मिळणार आहे.
नियोजन आणि महसूल विभागात समन्वयाचा अभाव
नैना क्षेत्राचा विकास रखडण्यामागे सिडकोच्या नियोजन अर्थात प्लानिंग आणि महसूल विभागातील समन्वयाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही प्रकल्पाच्या विकासाचे मुख्य अंग असलेल्या या दोन्ही विभागात समन्वय राहील यादृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. नैना क्षेत्राच्या विकास प्रकल्पात हे दोन्ही विभाग एकत्र कार्यरत राहणे गरजेचे असल्याने येत्या काळात त्यादृष्टीनेसुध्दा सकारात्मक कार्यवाही करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.