नामदेव मोरेनवी मुंबई : शहरातील महानगरपालिकेसह प्रमुख खासगी रुग्णालयातील आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिट हाऊसफुल्ल झाली आहेत. यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयात आॅक्सिजन युनिटही कमी पडत असले, तरी महानगरपालिकेकडे आॅक्सिजन युनिटची संख्या मुबलक प्रमाणात आहे. आॅक्सिजनप्रमाणेच आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या अजून वाढविण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरू करून चाचण्यांची संख्या वाढविली आहे. रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू केले जात आहेत. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी विविध कारणांमुळे मृत्युदर अपेक्षित गतीने कमी होत नसल्याचे दिसते आहे. कारण वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये आयसीयू युनिट व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयात ३० आयसीयू युनिट असून, सर्व फुल्ल झाले आहेत. २४ व्हेंटिलेटरअसून, सद्यस्थितीमध्ये सर्व वापरात आहेत.२० पैकी १५ रुग्णालयात व्हेंटिलेटर नाहीशहरातील तेरणा, फोर्टीज, रिलायन्स, अपोलो, इंद्रावती, डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयामधील आयसीयू विभागात बेड उपलब्ध नाहीत. कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची परवानगी असलेल्या २० पैकी १५ रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. नवी मुंबईमध्ये शुक्रवारी सर्व रुग्णालयांमध्ये मिळून २६५ पैकी २३० आयसीयू युनिटमध्ये रुग्ण असून, ३५ युनिट शिल्लक आहेत. १०२ व्हेंटिलेटर्सपैकी फक्त २० शिल्लक आहेत. त्याचा तपशील मनपाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. मनपाच्या वाशी रुग्णालयासह प्रमुख खासगी रुग्णालयात आॅक्सिजन युनिटची ही कमतरता आहे, परंतु मनपाने सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये ४८३ आॅक्सिजन युनिट तयार केले असून, त्यापैकी ४४० शिल्लक आहेत. मनपाने आॅक्सिजन युनिटप्रमाणे आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडही उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली आहे.