मतदारयादीनंतर ओळखपत्रांचाही घोळ; प्रशासकीय दिरंगाईविषयी नागरिकांनी व्यक्त केला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:52 AM2019-03-28T00:52:50+5:302019-03-28T00:53:02+5:30
मतदारयादीप्रमाणे ओळखपत्र वाटपामध्येही घोळ सुरू झाला आहे. ओळखपत्र वाटप वेळेमध्ये केले जात नाही. कार्यालयामध्ये फेरी मारूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
- वैभव गायकर
पनवेल : मतदारयादीप्रमाणे ओळखपत्र वाटपामध्येही घोळ सुरू झाला आहे. ओळखपत्र वाटप वेळेमध्ये केले जात नाही. कार्यालयामध्ये फेरी मारूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपर्यंत ओळखपत्र मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रशासकीय स्तरावर अनेक महिन्यांपासून नवीन मतदार, मतदारांचा पत्ता बदल, ठिकाण बदल आदी दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. पनवेलमधील नागरिकांनी मतदानयादीमधील नावामधील व इतर त्रुटी सुधारण्यासाठी अर्ज केले होते. अनेकांनी नवीन नोंदणीचे अर्ज भरले होते. तब्बल १७ हजारांपेक्षा जास्त मतदारांचे ओळखपत्र नव्याने निवडणूक आयोगाने तयार करून ते निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत तलाठी, कोतवाल यांच्याकडे वाटपासाठी देण्यात आलेले आहेत. तलाठी कार्यालयामार्फत शहरनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे संबंधित मतदार ओळखपत्र वाटपाचे काम दिले आहे. याकरिता विविध शाळेतील शिक्षकांची बीएलओ म्हणून निवड करण्यात आली आहे. जवळ जवळ १०० बीएलओ याकरिता नेमले आहेत. त्यांच्याकडे मतदारांची ओळखपत्र वाटपासाठी देण्यात आली आहेत. मतदारांना या संपूर्ण प्रक्रि येबद्दल काहीच माहिती नसल्याने मतदार ओळखपत्रासाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयात खेटे मारत आहेत. तहसील कार्यालयात एका भिंतीवर लावलेल्या यादीत बीएलओचे दूरध्वनी क्र मांक लावण्यात आले आहेत. याच यादीमध्ये मतदार यादी क्रमांकाद्वारे संबंधित नेमलेल्या बीएलओशी संपर्क साधून आपले मतदार ओळखपत्र प्राप्त करावे, अशा सूचना या ठिकाणी दिल्या जातात. मात्र, सर्व प्रकाराची खातरजमा करूनदेखील मतदारांना ओळखपत्र प्राप्त होत नसल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्याच्या घडीला पनवेल तालुक्यात एकूण १७ हजारांच्या आसपास नवीन ओळखपत्रांचे स्मार्ट कार्ड आलेले आहेत. हे ओळखपत्र वाटपासाठी बीएलओकडेही दिलेले आहेत. मात्र, प्रत्यक्ष मतदारांना ओळखपत्र मिळण्यास विलंब लागत आहे.
निवडणूक आयोगामार्फत मतदारयादींमध्ये नाव नोंदणी तसेच दुरु स्तीचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत असते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक या प्रक्रि येमध्ये सहभाग घेत असतात. मात्र, नावनोंदणी करूनदेखील प्रत्यक्ष मतदार यादींमध्ये नावनोंदणी, निवडणूक ओळखपत्र मिळण्यास विलंब लागत असल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मतदानापूर्वी ओळखपत्र मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ओळखपत्र कधी मिळणार
पनवेलमध्ये निवडणूक आयोगामार्फत नव्याने मतदार नोंदणी, तसेच नाव-पत्ता दुरु स्ती केलेल्या मतदारांची जवळ जवळ १७ हजार ओळखपत्र आलेली आहेत. तलाठी यांच्याद्वारे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे मतदारांना वाटपासाठी देण्यात आलेले आहेत. संबंधित बीएलओंची यादीदेखील तहसील कार्यालयात लावण्यात आलेली आहे. मात्र, मतदार ओळखपत्र वाटपाची प्रक्रि या अद्याप सुरू झाली नाही.
नवी मुंबईमध्येही गोंधळ
नवी मुंबईमध्येही अनेकांना मतदान ओळखपत्र मिळालेली नाहीत. कर्मचारी ओळखपत्र घेऊन मतदारांचा पत्ता शोधत फिरत आहेत; पण अनेकांचे पत्ते चुकीचे लिहिले आहेत. मंगळवारी वाशीमध्ये ओळखपत्र घेऊन फिरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सेक्टर १७ मध्ये नागरिकांना हा पत्ता कुठे आहे, अशी विचारणा करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये ओळखपत्र बी टाइप इमारतीमधील होती व पत्ता सेक्टर १७ असा लिहिण्यात आला होता, यामुळे दोन तास फिरूनही पत्ता शोधता आला नव्हता.
नव्याने १७ हजार ओळखपत्र आलेली आहेत. तलाठीमार्फत बीएलओकडे मतदार ओळखपत्र वाटपासाठी देण्यात आलेली आहेत. लवकरच सर्व मतदारांना ती ओळखपत्र प्राप्त होतील. ओळखपत्र स्मार्ट कार्ड स्वरूपात असल्याने सर्व मतदारांचे ओळखपत्र बनण्यास विलंब लागत आहेत. ज्या मतदारांना ओळखपत्र या वेळेला प्राप्त होणार नाहीत. अशा मतदारांना पुढील काही महिन्यांच्या कालावधीत ओळखपत्र प्राप्त होतील.
- रावसाहेब गांगुर्डे,
नायब तहसीलदार,
पनवेल