जेएनपीटीला प्रदूषणाचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:56 AM2017-08-29T02:56:49+5:302017-08-29T02:57:09+5:30
जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्प आणि ट्रकफार्ममधून सातत्याने होणा-या तेल आणि रासायनिक पदार्थांच्या गळतीमुळे परिसरातील वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे.
मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्प आणि ट्रकफार्ममधून सातत्याने होणा-या तेल आणि रासायनिक पदार्थांच्या गळतीमुळे परिसरातील वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. नाले, गटारे यांच्यामधून रासायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे आणि अतिउग्रदर्पामुळे ये-जा करणाºया कामगारांना नाक मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. सातत्याने नाले, गटारांतून वाहणारे रसायनमिश्रीत दूषित पाणी थेट समुद्रात मिसळत असल्याने जलप्रदूषणाबरोबरच मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषणही होत असल्याने येथील प्राणी, पक्षी आणि माशांसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
जेएनपीटी परिसरातील ५०० हेक्टर क्षेत्रात अनेक रासायनिक ट्रकफार्म उभारण्यात आले आहेत. जेएनपीटी बंदरात आलेले रॉकेल, डिझेल, नाफ्ता, क्रूड आॅइलसारखे रासायनिक द्रव पदार्थ पाइपलाइनद्वारे येथील विविध कंपन्यांच्या ट्रकफार्ममध्ये जमा केले जातात. त्यानंतर टँकर अथवा अन्य साधनांमार्फत इतरत्र पाठविले जातात. नामांकित रासायनिक कंपन्यांकडून सातत्याने निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने अनेक वेळा ट्रकफार्ममधूनच तेलगळतीचे प्रकार होतात. तर काही वेळा तेलचोर माफियांकडून तेलवाहिन्यांनाच टॅप लावून, फोडून चोरीचे प्रकार घडतात. यामुळे मात्र होणाºया तेलगळतीमुळे रासायनिक मिश्रीत दूषित पाणी, रसायने थेट नाल्यात येऊन मिसळतात. गटारे, नाल्यामार्फत हे रासायनिक मिश्रीत दूषित सांडपाणी थेट येथील समुद्रात आणि नजीकच्या खाड्यात मिसळले जाते. ज्या समुद्र आणि खाड्यांत येथील स्थानिक मच्छीमार मासेमारी करून आपल्या कुटुंबीयांचा चरितार्थ चालवितात. दूषित पाण्यामुळे मात्र खाड्या आणि समुद्रात जलप्रदूषण होत असल्याने मासेमारीच धोक्यात येत आहे. त्याशिवाय वायुप्रदूषणामुळे प्राणी, पक्षी आणि माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चार-पाच दिवसांपासून जेएनपीटीतील ट्रकफार्म परिसरात पावसाने भरलेली गटारे, नाल्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात तेलतवंग दिसून आल्याची माहिती जेएनपीटी कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी दिली. न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याजवळील रस्ते ते जेएनपीटी परिसरात ट्रकफार्मजवळील पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहने जातात. तेलमिश्रीत पाणी सभोवार उडते. परिसरात दूषित रासायनिक तेलाचा मोठ्या प्रमाणात उग्र दर्प येत असल्याने कामगारांना या मार्गावरून ये-जा करणेही कठीण झाले आहे.