नवी मुंबई : वाशीचा महाराजा या नावाने ओळख निर्माण झालेल्या वाशी सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ३५ वे वर्ष आहेत. विविध ऐतिहासिक व प्रबोधनकारी देखावे, हे या मंडळाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे. यावर्षी मंडळाने उत्तराखंड येथील प्राचीन शिवमंदिराचा आकर्षक देखावा साकारला आहे. तो पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहेत.
सिंहासनारूढ श्रींची मूर्ती हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मंडळाच्या स्थापनेपासून मूर्तीची संकल्पना कायम ठेवण्यात आली आहे. घाटकोपर येथील मूर्तिकार बा.बी. बांदेकर यांच्या कार्यशाळेत ही आकर्षक मूर्ती साकारण्यात आली आहे. गणेशाचे विलोभनीय रूप भाविकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे भरपावसात सुद्धा दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून येते. मागील सात दिवसांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वाशीच्या महाराजाचे दर्शन घेतले आहे. उत्सव साजरा करताना मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याचाही सकारात्मक प्रयत्न केला आहे. अपंगांना तीनचाकी सायकलचे वाटप, कर्णबधिरांना श्रवण यंत्रे, गरजूंना वैद्यकीय साहाय्य, चौथीपर्यंतच्या ५0 विद्यार्थ्यांचा दरवर्षी शैक्षणिक खर्च, आपत्कालीन परिस्थितीत मदत आदी उपक्रमांत मंडळाचा सकारात्मक पुढाकार राहिला आहे. मंडळाच्या कार्यकारिणीवर सर्वधर्मियांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. एकूणच धार्मिक सलोखा जपण्याबरोरच पारंपरिक पद्धतीने स्वच्छता आणि सुरक्षिततेला मंडळाने प्राधान्य दिले आहे. मंडळाच्या गणेशोत्सवाला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.
मंडळाच्या स्थापनेपासून माजी नगरसेवक संपत शेवाळे हे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा होत आहे. त्यांच्या सोबतीला दिलीप राऊळ, दिलीप धुमाळ, राम विचारे, दिनेश काणानी आदींची यांची टीम कार्यरत आहे.