नवी मुंबई : गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून महापालिकेवर लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्याने प्रशासनातील अधिकारी सोकावले आहेत. नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहराचा डीपी अर्थात विकास आराखडा तयार करायला महापालिकेला उशीर झाला आहे. आरक्षित भूखंडावरून सिडको आणि महापालिकेत वाद आहेत. ते सोडवून येत्या १५ दिवसांत आयुक्तांनी सिडकोशी चर्चा करून मंत्रालयातून डीपीला मान्यता मिळवून आणावी. तसे झाले नाही तर शहरातील नागरिकांना घेऊन आपण आयुक्त कार्यालयात घुसू, असा संतप्त इशारा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी वाशी येथे दिला.
नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला. यात शहरवासीयांच्या नागरी समस्यांवर चर्चा करून त्या साेडविण्यावर भर दिला. त्यावेळी आरक्षित भूखंडांची सिडकोने चालविलेली विक्री, रस्त्यांचे चुकीचे नियोजन, महापालिकेच्या डीपीला अद्याप न मिळालेली मंजुरी या विषयांवर जनतेच्या भावना लक्षात घेऊन नाईक यांनी वरील शब्दांत आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यांनी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा इशारा दिल्यावर उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर महापालिका, सिडको, महावितरण, एमआयडीसीचे अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. जनतेने विचारलेल्या प्रश्नांवर ते प्रशासनाची बाजू मांडत होते. कार्यक्रमास माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक सभागृहात उपस्थित होते.या जन संवाद कार्यक्रमात कोपरखैरणे-घणसोली रस्त्याचे फसलेले नियोजन, आरक्षित भूखंडाची होणारी विक्री, त्यामुळे सार्वजनिक सुविधांअभावी होणारे जनतेचे हाल याबाबत माजी लोकप्रतिनिधींसह उपस्थित जनतेच्या भावना तीव्र होत्या.
सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दोष न देता नाईक यांनी सिडको, एमआयडीसी व महापालिकेेचे अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्रालयात अनेकदा जातात. आपली कामे करतात. मग, त्यांना जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या डीपीबाबत वेळ का मिळत नाही? तो मंजूर व्हावा असे का वाटत नाही? आमच्या भावना महापालिका आयुक्तांना कळवा. नाहीतर, त्यांच्या दालनात घुसून हा विषय तडीस न्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणता अधिकारी काय करतो, कोणाचा नातेवाईक काय करतो, कोणती कामे घेतो हे लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेला माहीत आहे. त्यांनी आपला कारभार सुधारला नाही, तर मी स्वत: आयटी आणि ईडीकडे तक्रार करेन, असा इशाराही यावेळी गणेश नाईक यांनी दिला.