वैभव गायकर,पनवेल: सध्याची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढाई असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि.4 रोजी पनवेल येथे सभेत केली. पक्षाच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. देशात पुन्हा चुकून भाजपची सत्ता आली तर ही निवडणूक शेवटची निवडणूक असणार असल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपला सत्तेत येणार असल्याचा एवढाच आत्मविश्वास आहे तर पण फोडाफोडी कशाला करता? अयोध्या विमानतळाचे नामकरण करण्यात आले तर नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव अद्याप दिले जात नाही, यांसह अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे पाटील हेच उमेदवार असल्याचे देखील अप्रत्यक्षरित्या यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगिलते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी देखील भाजपवर टीका केली. भ्रष्टाचारी, बलात्करी आणि तडीपाऱ्यांचा पक्ष हा भाजप आहे. या भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याची आवश्यकता असल्याचे शिवसेनेचे राऊत म्हणाले.यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, संजोग वाघेरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार बारणे यांच्या कार्यालयाच्या बाजूला शिवसेनेचे नवीन कार्यालय
शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल शहरातील कार्यालयाच्या बाजूलाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवीन कार्यालय सुरु करण्यात आल्याने भविष्यात दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याठिकाणी खटके उडण्याची शक्यता आहे. लहानपणीच्या आठवणींना उजाळा
पनवेल हे माझ्या आजोबांचे गाव आहे. लहानपणी पनवेल शहरात मी आजोबांसोबत फिरत असे. शहरातील विरुपाक्ष मंदिरात मी अनेकवेळा गेलो असल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी पनवेलच्या सभेच्या निमित्ताने जागी केली.