नवी मुंबई : रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने बंदची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागाचा मेळावा रविवारी कोपरखैरणे संपन्न झाला. या वेळी ३० जूनपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ जुलैपासून राज्यभरातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत बंद राहतील असा इशारा कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शशांक राव यांनी दिला.राज्य सरकारने रिक्षांचे परमिट खुले केल्यापासून सर्वच प्रमुख शहरांमधील रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे भाडे मिळवण्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद उद्भवू लागले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी खुले करण्यात आलेले रिक्षा परमिट थांबवण्याची सर्वच रिक्षा संघटनांची मागणी आहे. त्याशिवाय भाडेवाढीला मंजुरी मिळावी व विम्याच्या रकमेत करण्यात आलेली भरमसाट वाढ कमी करावी अशी देखील त्यांची मागणी आहे. याकरिता आॅटो रिक्षा कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु सरकार दखल घेत नसल्याने ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास ९ जुलैपासून राज्यातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.त्या अनुषंगाने कोकणविभागाचा मेळावा रविवारी कोपरखैरणेत घेण्यात आला. सदर मेळाव्यास कोकण विभागातील रिक्षा व टॅक्सी संघटनांचे सुमारे ५०० हून अधिक पदाधिकारी व चालक उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना अध्यक्ष शशांक राव यांनी ३० जूनपर्यंतच्या मुदतीत सर्व मागण्यांची पूर्तता करावी, असे स्षष्ट केले.याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांनीही रिक्षा व टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांविषयी विधिमंडळात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, दशरथ भगत, भरत नाईक आदी उपस्थित होते.
सरकारने मागण्या मान्य न केल्यास बंद निश्चित - शशांक राव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 2:45 AM