नांदगाव /मुरूड : मुरूड तालुक्यातील रस्ते हे खड्डेमय झाले असून, अनेकदा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम खाते याकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाही. आजची परिस्थती पाहता, मुरूड ते साळाव व मुरूड ते सावली हे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. बांधकाम खाते कोणतेच काम करत नसून, फक्त पाहण्याची भूमिका घेत असेल, तर आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आठ दिवसांत जर खड्डे बुजवण्यास सुरु वात केली नाही, तर ‘रास्ता रोको’ करून आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे मुरूड शहराध्यक्ष प्रवीण बैकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना गुरु वारी देण्यात आले.जिथे पाहवे तिथे खड्डे असतील, तर पावसाळा गेला तरी बांधकाम खाते करतेय काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. या खड्ड्यांचा त्रास गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना सहन करावा लागत आहे. अति तातडीची वैद्यकीय सेवा ज्या वेळी रु ग्णांना आवश्यक असते, अशा वेळी खड्ड्यांमुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होतो. यामुळे रुग्ण दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत. या सर्व बाबीस बांधकाम खाते जबाबदार असून, त्वरित खड्डे भरा तर जिथे रस्ते नवीन स्वरूपात बनवायचे असतील ते त्वरित करा, अन्यथा ‘रास्ता रोको’ करू, असा इशारा प्रवीण बैकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत अधिक माहिती देताना बैकर म्हणाले की, आठ दिवसांत आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास, शहरातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन, ‘रास्ता रोको’ करून बांधकाम खात्यास वेठीस धरू. (वार्ताहर)
दुरुस्ती न झाल्यास ‘रास्ता रोको’
By admin | Published: December 23, 2016 3:17 AM