अधिकाऱ्यांना काम करू न दिल्यास यंत्रणेचा बट्ट्याबोळ होईल
By admin | Published: March 27, 2017 06:32 AM2017-03-27T06:32:48+5:302017-03-27T06:32:48+5:30
मंत्र्यांचे बंधू असणे हा गुन्हा नाही. राज्य सरकारने एकदा धोरण ठरविले पाहिजे. चांगल्या अधिकाऱ्यांना काम करू द्यायचे
पनवेल : मंत्र्यांचे बंधू असणे हा गुन्हा नाही. राज्य सरकारने एकदा धोरण ठरविले पाहिजे. चांगल्या अधिकाऱ्यांना काम करू द्यायचे नाही, असेच जर सुरू राहिले तर प्रशासकीय यंत्रणेचा बट्ट्याबोळ होईल, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींनी व्यक्त केले.
विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांची संघर्ष समितीने भेट घेतली आणि डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा, अशी मागणी केली.
डॉ. शिंदे यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि वेळ पडली तर दोन्ही सभागृहात या विषयावर चर्चा केली जाईल, असे आश्वासन उभयतांनी शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी शेकापचे आमदार बाळाराम पाटील हेसुद्धा मुंडे यांच्या दालनात उपस्थित होते.
या वेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. सुरेश लाड यांची देखील भेट शिष्टमंडळाने घेतली. कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळात अॅड. आर. के. पाटील, उज्ज्वल पाटील, पराग बालड, अॅड. संतोष सरगर, संतोषी मोरे आणि दर्शना भडांगे आदींचा समावेश होता. (वार्ताहर)