'सरकारला वेळ नसल्यास नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आम्ही करू'; विजय वडेट्टीवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 03:46 PM2023-10-26T15:46:31+5:302023-10-26T15:49:06+5:30
नवी मुंबईकरांना सरकार अजून किती दिवस वेठीस धरणार आहे?, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. प्रधानमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोर खेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना सरकार अजून किती दिवस वेठीस धरणार आहे?, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी न केलेल्या कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. या सरकारला हा नैतिक अधिकार कोणी दिला?, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. न केलेल्या कामाचे लोकार्पण करताना या सरकारला कमीपणा वाटत असावा, म्हणून नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण रखडवले आहे. या लोकार्पण सोहळ्यावर कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आम्ही हा लोकार्पण सोहळा जनतेचा पैसा न खर्च करता करू, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
आघाडी सरकारच्या काळात मेट्रो प्रकल्पांची मूहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १२ वर्षे नवी मुंबईकरांनी मेट्रोची वाट पाहिली. १३, १४ ऑक्टोबर आणि त्यानंतर १७ ऑक्टोबर अशा तीन वेळा लोकार्पणासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. पण सरकारने नवी मुंबईकरांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रधानमंत्र्यांचा मुंबई दौरा झाला त्यानंतर आता शिर्डी दौऱ्याला वेळ आहे परंतु नवी मुंबईला यायला वेळ नाही. लोकार्पणाला वेळ नाही म्हणून पूर्ण झालेल्या प्रकल्पांची सेवा जनतेला मिळत नाही, याचा खेद वाटत असल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.