नवी मुंबई : कोपरखैरणे येथील महापालिकेच्या सीबीएसई शाळेत मागील काही वर्षांपासून पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. दरवर्षी विद्यार्थ्यांचा पट वाढत असताना शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी पालकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाला कळविले आहे मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून गुरुवारी पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पुरेसे शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याची घोषणा करून सोमवारी महापालिका मुख्यालयात शाळा भरविण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
महापालिकेने गेल्या काही वर्षांपूर्वी सीवूड आणि कोपरखैरणे विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. सीवूडची शाळा एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू असून कोपरखैरणेतील शाळा महापालिका स्वतः चालवत आहे. या शाळेत शिक्षकांची कमतरता असून अनेकवेळा मदतनीसांनादेखील शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागत आहे. महापालिका शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांचा पट वाढत असताना शिक्षकांची संख्यादेखील वाढणे आवश्यक आहे. कोपरखैरणेतील शाळेत सद्यस्थितीत १ हजार ३७५ पटसंख्या असताना फक्त दहा शिक्षक आहेत. शिक्षकांची संख्या वाढवावी यासाठी पालकांनी अनेकवेळा मागणी केली आहे. परंतु, शिक्षक भरती केली जाणार असल्याचे उत्तर नेहमीच प्रशासन देत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असताना शिक्षकांची संख्या न वाढवल्याने पालकांनी अखेर गुरुवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर सुमारे पाच तास ठिय्या आंदोलन केले. महापालिका प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त पालकांनी जोपर्यंत पुरेसे शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत शाळा बंदची घोषणा करून सोमवारी थेट पालिका मुख्यालयात शाळा भरविण्याचा इशारा दिला. याबाबत महापालिकेच्या शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर शिक्षण उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.