लोकमत रिअॅलिटी चेक - वशिला असेल, तरच कामे होतील; आरोग्य यंत्रणा फक्त कागदावरच सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:52 AM2020-06-28T00:52:19+5:302020-06-28T00:52:47+5:30
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आम्हाला माहीत नाही, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे बेपर्वा उत्तर
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वाशीमधील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात वशिला असणाºयांनाच मदत केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य केले जात नसल्याचे समोर येऊ लागले आहे. शुक्रवारी मध्यरात्री रुग्णालयाशी संपर्क साधून यंत्रणेच्या दक्षतेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव देण्याचेही टाळण्यात आले. आम्हाला माहिती नाही, दुसऱ्या फोनवर संपर्क साधा, अशी उत्तरे दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा फक्त कागदावरच सक्षम आहे. प्रत्यक्षात सर्वत्र अनागोंधी कारभार सुरू आहे. मनपा रुग्णालयातून चांगले उपचार हवे असल्यास, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा वशिला असेल, तरच कामे होत आहेत. वाशी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे हेही ठरावीक राजकारण्यांचेच फोन उचलतात. इतर कोणालाच ते उपलब्ध होत नाहीत. डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी प्रयत्न केला. रुग्णालयाच्या फोन नंबरवर संपर्क साधून एका व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मृतदेह शवागारामध्ये ठेवायचा असून, यासाठी कोणाशी संपर्क साधायचा, अशी विचारणा केली. यानंतर, समोरील कर्मचाऱ्यांनी फोन कट केला.
मनपा रुग्णालयाच्या सर्व नंबरवर फोन करून किमान जबाबदार अधिकाऱ्याचे नाव व नंबर मागितला असता, आम्हाला रात्रपाळीची जबाबदारी कोणावर आहे, याची माहिती नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क नंबर आमच्याकडे नसल्याचे उत्तर दिले. याविषयी माहिती घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्याशी अडीच वाजता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. निवासी वैद्यकीय अधिकारी रवींद्र म्हात्रे यांनीही फोन उचलला नाही. पालिकेच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधल्यानंतर, त्यांनाही फक्त रुग्णालयातील दूरध्वनीव्यतिरिक्त काहीही माहिती देता आली नाही. मनपा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मृतदेह ठेवण्यासाठी काय करायचे, हे शवविच्छेदन अधिकाºयांना विचारा, अशी माहिती दिली. एक तास संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही योग्य माहिती कोणालाही देता आली नाही. यामुळे एखादी गंभीर स्थिती उद्भवली, तर नक्की संपर्क कोणाशी साधायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
डॉ.सिंग यांची दक्षता
मनपा रुग्णालयातील एक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हरविंदर सिंग यांच्याशीही मध्यरात्री अडीच वाजता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तत्काळ फोन उचलून काय काम आहे, हे ऐकून घेतले. मृतदेह मनपाच्या रुग्णालयात ठेवायचा असल्याचे सांगितले, परंतु मृतदेह पनवेल मनपाच्या हद्दीतील असल्याचे समजल्यानंतर सद्यस्थितीमध्ये मनपा क्षेत्राबाहेरील मृतदेह नवी मुंबई मनपाच्या शवागारात ठेवला जात नसल्याचे सांगितले. योग्य पद्धतीने माहिती दिल्यामुळे समोरील व्यक्तीनेही त्यांचे आभार मानले.