- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : अकरा महिन्यांत नवी मुंबईसह पनवेल व उरण क्षेत्रात दुचाकींचे ९९ अपघात घडले आहेत. त्यामध्ये ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी अनेकांनी हेल्मेटचा वापर केलेला नसल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन प्राण गमावले आहेत. रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, अपघात झाल्यास शरीराच्या इतर भागासह डोक्यालाही जखम होत आहे. अशा वेळी डोक्याला झालेली जखम अनेकांच्या जिवावर बेतत आहे. मात्र, हेल्मेट हे सुरक्षेचे साधन म्हणून पाहण्याऐवजी कायद्याची सक्ती म्हणून बघितले जात आहे. यामध्ये पळवाट म्हणून हेल्मेट न घालता पोलिसांना चकमा देण्यात दुचाकीस्वार पटाईत झाले आहेत, परंतु अपघातामध्ये मृत्यूला चकमा देऊ शकलेले नाहीत. परिणामी वेगापाई हे लोक मृत्यूला आमंत्रण देत आहेत. सायन-पनवेल मार्गावर सर्वाधिक अपघात सायन-पनवेल मार्गावर सर्वाधिक अपघात घडले आहेत. मुंबई-पुण्याला जोडणारा हा मार्ग असल्याने येथे सतत वर्दळ असते. अशा वेळी वाहतुकीच्या नियमांना बगल देणे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसह वाहनांची गती त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शिस्तीत वाहन चालविण्याऐवजी वेडीवाकडी वाहने पळवून एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. यामध्ये एखाद्या वाहनाची धडक लागून होणाऱ्या अपघातात चालकांना प्राण गमवावे लागत आहेत. शहरात घडलेल्या एखाद्या अपघाताच्या वेळी दुचाकीस्वाराने घातलेले हेल्मेट त्याला जीवदान देऊ शकते, परंतु जनजागृती व कारवाई करूनही हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बहुतांश अपघातामध्ये हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वार अथवा मागे बसल्याचा मृत्यू झालेला आहे. - पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त-वाहतूक
हेल्मेट असते तर वाचला असता जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 1:24 AM