उरण : राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणा-यांनी रायगड-उरणचे रस्ते पाहिल्यास त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. उरण येथे राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी, कामगार, मच्छीमार, बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर आयोजित केलेल्या जाहीर मेळाव्यात पवार बोलत होते.उरण येथील उनपच्या डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी मैदानात आयोजित जाहीर मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी महाराष्टÑाच्या विकासासाठी ज्या शेतकरी, कष्टकºयांनी त्याग केला आहे त्या स्थानिकांना उद्ध्वस्त होऊ न देता, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी राष्टÑवादी काँग्रेस नक्कीच लढा देईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली. जेएनपीटी बंदरात सुरू झालेल्या डीपीडी धोरणामुळे अनेक सीएफएस बंद पडले आहेत, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सीएफएसवर अवलंबून असलेल्या सुमारे ४० हजार कामगारांवर उपासमारीचे संकट येऊ घातले आहे.केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली आणि नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत लवकरच संयुक्त बैठक घेऊन याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन पवार यांनी जाहीर मेळाव्यातून दिले. शेतकरी, कामगार, मच्छीमार, बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर येथील कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली. अन्यायाविरोधातील लढाईसाठी प्रसंगी आपण कायद्याच्या चौकटीबाहेरही जात असल्याचेही पवार म्हणाले. येथील स्थानिक प्रश्नांच्या संघर्षात राष्टÑवादी कायम जनतेच्या सोबत राहील, अशी ग्वाहीही पवार यांनी जाहीर मेळाव्यातून दिली.
रस्ते पाहिल्यास ‘त्यांना’ विश्रांतीच घ्यावी लागेल- शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 5:19 AM