मतदान न केल्यास कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:56 AM2019-04-24T00:56:37+5:302019-04-24T00:57:56+5:30
पनवेल महापालिका हद्दीत मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपले कर्तव्य पार पाडावे. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करणे ही शासकीय कर्मचाºयांची जबाबदारी आहे. पालिका कर्मचाºयांनी सुट्टीचा उपभोग घेत मतदान न केल्यास त्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी परिपत्रक काढले आहे.
परिपत्रकात, कर्मचाºयांना मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत सर्व आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगार यांनी मतदानाची जबाबदारी पार पाडावी, असे नमूद केले आहे. संबंधित अधिकाºयांच्या अधिन काम करणारे अधिकारी, कर्मचारी, हंगामी कर्मचारी, हंगामी कामगार यांनी मतदान केल्याची खातरजमा करून तसे पत्र ३० एप्रिल रोजी संबंधित विभागप्रमुखांनी आयुक्त कार्यालयाकडे सादर करावे. मतदान करण्यासाठी शासनाने सुट्टी दिल्यामुळे दिलेली सुट्टी शासकीय कामकाजाचाच भाग आहे. त्यामुळे मतदान न करणाºया अधिकारी, कर्मचाºयांना २९ एप्रिल या एका दिवसाचे वेतन मिळणार नाही आणि याकरिता कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा खुलासा मागविण्याची आवश्यकता नसल्याचे आयुक्त देशमुख यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शासकीयस्तरावर अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या दृष्टीने महापालिकेनेही कंबर कसली आहे.
आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई?
शासनाने मंजूर केलेली पगारी सुट्टी लक्षात घेता, २९ एप्रिल रोजी गैरहजर राहणे व मतदान न करणे, म्हणजेच काम न करता वेतन घेण्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र अशी नोंद घेण्याचे आवाहन परिपत्रकात आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.