- नामदेव मोरेनवी मुंबई : कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतात मागणीच्या तुलनेत डाळींचे उत्पादन खूपच कमी होते. यंदा पावसाअभावी डाळींच्या लागवडीत आणखी घट होण्याची चिन्हे असून, २५ लाख टन डाळ आयात करावी लागण्याची नामुष्की ओढवणार आहे. समस्त देशवासीयांच्या दैनंदिन आहारातील मुख्य घटक असलेली तूरडाळ त्यामुळे अधिक भाव खाणार असून, किलोला २०० रुपये एवढी महाग होण्याची शक्यता आहे.
चार वर्षांपासून दरवर्षी साधारण २५ लाख टन डाळींची आयात करावी लागते. गेल्यावर्षी २५ लाख २९ हजार टन डाळ आयात करावी लागली. त्यावर १५ हजार ९८५ कोटी रुपये खर्च झाला. प्रतिदिन सरासरी ७ हजार टन डाळ आयात करावी लागते. मूग, काबुली चणा, वाटाण्याच्या निर्यातीवर बंदी असल्यामुळेही बाजारभाव नियंत्रणात अडथळे येऊ लागले आहेत.
मूग, चणा आणि वाटाण्यावरील निर्बंध हटविण्याची मागणीतूरडाळीच्या आयातीवर कोणतेच निर्बंध नाहीत; पण मूग, चणा व वाटाण्याची आयात बंद आहे. तूरडाळीचे जगात पुरेसे उत्पादन नसल्यामुळे आयातीतही अडथळे येतात. मूग, चणा व वाटाण्याची आयात निर्बंधमुक्त केली तर त्याची आयात वाढून इतर डाळी, कडधान्याचे दरही नियंत्रणात येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तूरडाळीचा देशात तुटवडा आहे. जगभर उत्पादन कमी असल्यामुळे पुरेशी आयात होत नाही. शासनाने चणा, वाटाणा व मूग आयात करण्यासाठी सर्वांना परवानगी दिली तर इतर वस्तूंचे दरही नियंत्रणात येतील.- देवेंद्र वोरा, व्यापारी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
या देशांमधून कडधान्याची आयातटांझानिया, मोझांबिक, म्यानमार, सुदान, युगांडा, कॅनडा, युक्रेन, रशिया, तुर्कस्थान, ऑस्ट्रिया, केनिया, ब्राझील व इतर.