चांगल्या डॉक्टरांचा सल्ला मानला नाही तर घोटाळा होतो - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 05:28 AM2020-02-10T05:28:09+5:302020-02-10T05:28:33+5:30
साथ सोडणाऱ्यांवर टीका : नवी मुंबईत केमिस्ट ब्लड बँकेचे उद्घाटन
नवी मुंबई : चांगल्या डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो. मात्र, डॉक्टरांचा सल्ला मानला नाही तर घोटाळा होतो, अशी मिश्कील टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेतेमंडळीवर केली.
नवी मुंबई रिटेल केमिस्ट अॅण्ड होलसेलर्स असोसिएशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या केमिस्ट ब्लड बँकेचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते रविवारी सानपाडा येथे झाले. या प्रसंगी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्रीछगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे, महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.
केमिस्ट ब्लड बँकेमुळे गरजू आणि गरीब नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. केमिस्ट असोसिएशनही संकटकाळात मदतीला धावून येणारी सेवाभावी संघटना आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव केला. तसेच आॅनलाइन औषधविक्री सुविधा देताना कोणत्या औषधांना परवानगी द्यावी, यासाठी नियम होण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारबरोबर लवकरच चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खूप बोलायचे आहे; परंतु भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे येथे उपस्थित आहेत, त्यामुळे बोलत नाही; परंतु त्या आपल्याच आहेत, असे छगन भुजबळ या वेळी आपल्या भाषणात म्हणाले.
तर राज्यात दरवर्षी १३ लाख बाटल्या रक्ताची गरज असते. विविध ब्लड बँकेच्या माध्यमातून सध्या ११ लाख बाटल्या रक्त जमा होते. केमिस्ट ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्ताची गरज काही प्रमाणात पूर्ण होईल, असा विश्वास राजेंद्र शिंगणे यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी महापौर जयवंत सुतार यांचेही भाषण झाले.
असोसिएशनचे सचिव सुनील छाजेड यांनी प्रस्ताविकपर भाषण केले. तर अनिल नामंदर यांनी केमिस्ट व्यावसायिकांना भेडसावणाºया समस्या मांडल्या.
याप्रसंगी आॅल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, माजी आमदार मिलिंद कांबळे, माथाडी नेते शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.
छगन भुजबळ यांचा राज ठाकरेंना टोला
मनसेने रविवारी बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी विराट मोर्चा काढला. या मोर्च्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मोर्चाला उत्तर मोर्चाने दिल्याचे स्पष्ट करीत या पुढे जास्त नाटक केल्यास दगडाला उत्तर दगडाने व तलवारीला उत्तर तलवारीने देऊ असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच ही लोकशाही आहे. त्यामुळे दगड आणि तलवारी आता जुन्या झाल्या आहेत. आता नवीन शस्त्र आली आहेत, असा टोला राज ठाकरे यांना लगावला.