चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास बालक मुदतपूर्व जन्माला येण्याचा धोका अधिक; डॉक्टरांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 05:12 PM2022-11-16T17:12:21+5:302022-11-16T17:12:40+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये आता करिअर, शिक्षण यामुळे स्थिरस्थावर न झाल्याने मुली उशीरा लग्न करत आहेत.
नवी मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये मुदतपूर्व बालके जन्माला येण्याचे प्रमाण वाढत असून यामागे गर्भधारणेचे वाढते वय हे देखील एक कारण असल्याचे मत डॉक्टरांनी नोंदविले आहे. चाळीशी किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या मातांमध्ये मुदतपूर्व बालके जन्माला येण्याचा धोका जास्त असतो. मुदतपूर्व म्हणजे प्रसूतीच्या ठराविक कालावधी (३७ आठवडे) आधीच बाळ जन्माला येणे. या बाळांची पुरेशी वाढ न झाल्याचे यांचे वजन कमी असतेय त्यामुळे या बाळांची सुरुवातीचे काही दिवस अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते.
गेल्या काही वर्षांमध्ये आता करिअर, शिक्षण यामुळे स्थिरस्थावर न झाल्याने मुली उशीरा लग्न करत आहेत. परिणामी गर्भधारणेचे वयही वाढले आहे. आता काही महिला वयाच्या पस्तीशीनंतर तर काही महिला अगदी चाळीशीनंतरही गर्भवती होण्याचा निर्णय घेत आहे. या वयामध्ये प्रजनन क्षमता कमी होते. त्यामुळे गर्भधारणा होणे ही फार अवघड असते. एआरटीसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आणखीनच शक्य झाले आहे. परंतु उशीरा गर्भधारणा झाल्याने बाळ मुदतपूर्व जन्माला येण्यासह परंतु उशीरा गर्भधारणेमुळे मुदतपूर्व जन्मासह अनेक गुंतागुंत होऊ शकतात, असे मेडिकव्हर रुग्णालयाच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांनी सांगितले.
खारघर येथील मदरहुड रूग्णालयातील सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ म्हणाल्या की, ‘‘ज्या मातांचे वय ३५ पेक्षा जास्त आहे त्यांना अकाली बाळ होण्याची शक्यता असते. पण प्रत्येक प्रकरणांमध्ये असं होत नाही. शिवाय, उशीरा गर्भधारणा करणाऱ्या महिलांना गर्भधारणा होण्यापूर्वी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईड समस्या यासारख्या आरोग्य समस्या असू शकतात. अकाली जन्मलेल्या बाळांना श्वासोच्छवासाचा त्रास, कमी प्रतिकारशक्ती आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यासारख्या आरोग्याच्या अनेक समस्या असू शकतात. अशा नवजात बाळांची एनआयसीयूमध्ये योग्यपद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे.''
वाढत्या वयासोबत गर्भधारणा होणे ही गोष्टही फार धोकादायक ठरु शकते. त्याचे मातेसह बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. अकाली जन्मलेल्या बाळाला श्वसनाचा त्रास, कावीळ यासोबतच अशक्तपणा, चिंता निर्माण होणे. तसेच प्रतिकारशक्ती कमी असणे, न्यूरोलॉजिकल विकार, श्रवणशक्ती कमी होणे, हृदयाच्या समस्या आणि कमकुवत स्नायूंचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या बालकांची रुग्णालयातच नाही तर घरी आल्यावरही अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला घरी घेऊन जाताना मातांनी डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. बाळाला ऍलर्जी, इन्फेक्शन आणि विविध रोगांपासून दूर ठेवण्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी स्तनपान गरजेचे आहे, असे मेडिकव्हर रुग्णालयाचे नवजात बालकांच्या आजाराचे तज्ज्ञ डॉ. नरजॉन मेश्राम यांनी सांगितले.
चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास यामध्ये गुंतागुंत होण्यासह उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया, गर्भावस्थेतील मधुमेह, थायरॉईड विकार, गुणसूत्रातील विकृती आणि बाळामध्ये संरचनात्मक दोष, वाढ प्रतिबंध आणि मुदतपूर्व जन्म याचा धोका असतो. अशा बाळांना जन्मानंतरही दीर्घकाळ काळजी घेण्याची आवश्यकता असते. अकाली जन्मलेली बाळांची फुफ्फुसे, पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचा यांचा विकास पूर्णपणे झालेला नसतो, असे डॉ. अनू विज यांनी स्पष्ट केले.
अकाली जन्मलेल्या बाळांना एसआयडीएस म्हणजे अचानक मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. या बाळांचा शारीरिक विकास आणि वाढ होण्यास थोडा वेळ लागतो. काही बाळांना बराच काळ अतिरिक्त ऑक्सिजन किंवा ट्यूब फीडिंगवर ठेवावे लागते. त्यामुळे या बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे, असे ही डॉ. मेश्राम म्हणाले.