जव्हार : तेच-तेच ग्राहक चार हजार रुपये काढण्यासाठी येत असल्याचे स्टेट बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले असून अशा ग्राहकांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा फलक बँकेने बाहेर लावला आहे. पैसे काढण्यासाठी रोज लागणारी लांबचलांब रांग गेला आठवडा झाला तरी का होत नाही? याची पडताळणी बँकेने केली असता तेचतेच ग्राहक पैसे बदलून घेण्यासाठी अथवा पैसे काढण्यासाठी येत असल्याचे आढळून आल्याने ही नोटीस लावण्यात आली आहे. नोटा बदलण्याच्या सुविधेचा काही ग्राहक रोजच गैरफायदा घेत असल्याचे, बँकेच्या कर्माचाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे मात्र आतापर्यंत सतत पैसे काढणाऱ्या कोणत्याही व्यक्तींवर कारवाई झालेली नाही. ही नोटीस लावली तरीही जव्हारच्या स्टेट बँकेसमोरील नागरिकांची पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी कमी होतांना दिसत नाही. स्टेट बँके बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. काही धनदांडग्यांनी पाच दहा टक्के कमिशन देऊन आपल्याकडील ५००० व १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी भाडोत्री माणसे ठेवल्याची व तेच कमिशनच्या मोहा पोटी सतत नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहतात अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बँकेनी ही नोटीस लावली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. कोणी, किती वेळा नोटा बदलून घेतल्या याचे कोणतेच रेकॉर्ड नसल्याने अशा मंडळींना ओळखणार कसे? व त्यांच्यावर काय कारवाई करणार? हे मात्र बँकेने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे ही नोटीस कितपत परिणामकारक ठरेल याबाबतही बँक कर्मचाऱ्यातच शंका व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
दुसऱ्यांदा पैसे काढले तर कारवाई होणार
By admin | Published: November 18, 2016 2:20 AM