सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील १० टक्क्यांहून अधिक रुग्णालयांचे अद्यापही फायर ऑडिट झालेले नसल्याचे समोर येत आहे. तर ज्या रुग्णालयांमध्ये यंत्रणा कार्यान्वित आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांना तिच्या वापराविषयी अज्ञानता असल्याचेही दिसून येत आहे. परिणामी वसईसारखी दुर्घटना घडल्यास यंत्रणा असूनही ती वापरता न आल्यानेही मोठी जीवितहानी घडू शकते.
वसई व नाशिक येथील कोविड रुग्णालयांमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे राज्यभरातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती नवी मुंबईत घडू नये यासाठी महापालिकेने हालचालींना वेग दिला आहे.दहा दिवसांपूर्वीच ऐरोली येथील कोविड सेंटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने तिथल्या कर्मचाऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र इतरही रुग्णालयांमध्ये अशा घटना घडू नयेत, अथवा घडल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता यावे यासाठी महापालिकेने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. मात्र अग्निशमन विभागामार्फत दोन महिन्यांपूर्वीच शहरातील सर्वच रुग्णालयांची पाहणी केली होती. या वेळी १७३ खासगी रुग्णालयांपैकी ९ रुग्णालयांनी फायर ऑडिट केलेच नसल्याचे समोर आले होते. त्यापैकी काही रुग्णालयांना अनेकदा नोटीसदेखील बजावण्यात आलेली आहे, परंतु प्रशासनाकडून नोटीसव्यतिरिक्त काही ठोस कारवाई होत नाही. याचा गैरफायदा या रुग्णालयांकडून घेतला जात असल्याने फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
काही रुग्णालयांत दाटीने रुग्णांची व्यवस्था करून केवळ नफा कमवण्याच्या उद्देशाने चालवली जात आहेत. त्यापैकी काही रुग्णालयांत प्रवेश करताना रुग्णालादेखील अंग आखडते घ्यावे लागत आहे. परिणामी अशा रुग्णालयांमध्ये एखादी छोटीशी दुर्घटना मोठ्या जीवितहानीला कारणीभूत ठरू शकते.अशातच ज्या रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांना ती वापरायची कशी याबाबत ज्ञानच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठमोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याच्या सूचनादेखील पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने आपत्कालीन प्रसंगी तिथली अग्निशमन यंत्रणा असूनही निरुपयोगी ठरू शकते.सर्व रुग्णालयांची चाचपणीशहरातील सर्वच रुग्णालयांची नव्याने चाचपणी करून तिथल्या अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेतला जाणार आहे. यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार पाच पथके तयार करण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पाहणीत काही रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्यांनी अद्याप सुधार केला नसल्यास कारवाईचा इशारा दिला जाणार आहे.
अडचणीच्या जागेतही रुग्णालयेनवी मुंबईत १७३ हून अधिक खासगी रुग्णालये आहेत. तर पालिकेचे सहा कोविड सेंटर व पालिकेच्या परवानगीने चालवले जात असणारे सुमारे ५० कोविड सेंटर आहेत. बहुतांश खासगी रुग्णालये स्वतंत्र जागेऐवजी रो हाउस, गळ्यात चालवली जात आहेत. त्या ठिकाणी जरी अग्निशमन यंत्रणा असली, तरीही अडचणीच्या जागेमुळे आपत्कालीन प्रसंगी दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते.
रुग्णालयांचे फायर ऑडिट अग्निशमन विभागाचे प्रमुख शिरीष आरदवाड यांच्याकडे, ऑक्सिजन ऑडिट उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्याकडे तर स्ट्रक्चर ऑडिट शहर अभियंता संजय देसाई यांच्यामार्फत होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली पथके येत्या चार दिवसांत सर्वच रुग्णालयांची पाहणी करून आढावा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सादर करणार आहेत.