नामदेव मोरे
नवी मुंबई : जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे काम करणाºया अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही पालिका दुर्लक्ष करत आहे. जखमी व आजारीरुग्णांवर फक्त पालिका रुग्णालयात मोफत उपचार मिळत आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर खिशातून पैसे खर्च करून, नंतर विमा योजनेच्या लाभासाठी धावपळ करावी लागत आहे.
नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये १३ आॅगस्टला आग लागली. आग विझविताना स्फोट होऊन अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. या कर्मचाºयांवर तेथील रुग्णालयामध्येच उपचार करण्यात आले. ही घटना डी. वाय. पाटील रुग्णालयातच झाली असल्यामुळे तेथील व्यवस्थापनाने त्यांच्यावर मोफत उपचार केले, परंतु दुर्दैवाने ही घटना बाहेर घडली असती तर अग्निशमन दलाला महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविले असते. तेथे उपचार झाले नसते तर खासगी रुग्णालयात पाठविले असते. अग्निशमन दलाच्या जवानांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर खिशातून पैसे खर्च करावे लागतात. पहिले पैसे खर्च करायचे व नंतर वैद्यकीय विम्याच्या लाभासाठी धावपळ करायची अशी स्थिती आहे. शहरातील १४ लाख नागरिकांच्या रक्षणासाठी १३९ अधिकारी व कर्मचारी २४ तास राबत आहेत. आग लागली की जीव धोक्यात घालून ती विझविण्यासाठी प्रयत्न करतात. कमी मनुष्यबळ असल्यामुळे जादा काम करावे लागत आहे. कर्तव्यावर असताना जवान जखमी झाला किंवा इतर आजार झाल्यास त्यांना पैसे खर्च न करता उपचार मिळवून देणारी यंत्रणाच नाही.
महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांचे जीवन पूर्णपणे असुरक्षित झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात त्यांच्यावर मोफत उपचार होतात. परंतु सद्यस्थितीमध्ये मनपा रुग्णालयाची स्थिती अत्यंत बिकट आहे. तेथे जखमीवर टाके मारण्यासाठी आवश्यक वस्तूही मिळत नाहीत. रुग्णालये असून त्याचा काहीही लाभ नाही. यापूर्वी दोन वेळा आग विझविताना कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती केल्यानंतर कुटुंबीयांना खिशातून उपचार करावे लागले.उपचारासाठी रक्कम मिळविण्यासाठी सहा महिने हेलपाटे मारावे लागले होते.पावसाळ्यापासून ३३ आगीच्या घटनामहापालिकेने पावसाळा सुरू झाल्यापासून आपत्कालीन विभाग सुरू केला आहे. जूनपासून शहरात आग लागल्याच्या ३३ घटना घडल्या आहेत. शॉर्टसर्किटच्या १८, वीज पडण्याची एक घटना घडली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मदत करतात, परंतु दुर्दैवाने कर्तव्य बजावताना जवान जखमी झाल्यास त्यांच्यावर मोफत व योग्य उपचार होत नाहीत.प्रस्ताव बनविण्याचे काम सुरूमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जवान जखमी झाल्यास त्यांच्या उपचारासाठीच्या उपाययोजनांविषयी प्रस्ताव बनविण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या माध्यमातून त्याविषयी कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.