जंगल सत्याग्रहाच्या इतिहासाची उपेक्षा
By admin | Published: September 25, 2016 04:24 AM2016-09-25T04:24:50+5:302016-09-25T04:24:50+5:30
चिरनेर येथे १९३० मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहामध्ये १३ भुमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख घटनांमध्ये या आंदोलनाचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या
- नामदेव मोरे, नवी मुंबई
चिरनेर येथे १९३० मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहामध्ये १३ भुमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख घटनांमध्ये या आंदोलनाचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या आंदोलनाची माहीती तेथील पाठ्यपुस्तकांमध्ये दिली जाते. परंतु चिरनेर सत्यागृहाच्या हुताम्यांची माहिती देशवासीयांना व्हावी यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत. चिरनेरमध्ये स्मृतीस्थळास राष्ट्रीय स्मारक घोषीत करून त्याचा विकास करण्याकडेही शासनाने दुर्लक्ष केले आहे.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये ठाणे व रायगड जिल्ह्यातील भुमिपुत्रांचे योगदान महत्वाचे आहे. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून घणसोलीमधील स्वातंत्र्यसैनीकांपर्यंत मोठी ऐतिहासीक पार्श्वभूमी लाभलेली आहे. परंतु या परिसरातील प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाप्रमाणे भुमिपुत्रांचा इतिहासही दुर्लक्षीत राहिला आहे. यामध्येच चिरणेरच्या जंगल सत्याग्रहाचाही समावेश आहे. इंग्रजांनी आदिवासी नागरिकांचा जंगलावरील हक्क नाकारल्यानंतर देशभर आंदोलन सुरू झाले. चिरनेरच्या अक्काबाई जंगल परिसरामध्ये ठाणे व रायगड परिसरातील आदिवासी नागरिकांनी आंदोलन केले. इंग्रजांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारामध्ये १३ भुमीपुत्र शहीद झाले. तेव्हापासून २५ सप्टेंबर हा दिवस जंगल सत्यागृह स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. छत्तीसगडमध्येही झालेल्या जंगल सत्याग्रहाची दखल देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये घेण्यात आले. छत्तीसगड सरकारनेही या स्मृती जपल्या आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाने चिरणेरच्या ऐतिहासीक स्मृतीस्थळाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक वर्षी २५ सप्टेंबरला शासकीय मानवंदना देण्यात येते. परंतु तेवढी औपचारीकाता सोडली तर शासन पुन्हा वर्षभर फार गांभीर्याने याकडे लक्ष देत नाही. चिरनेर ग्रामस्थांनी हा ऐतिहासीक वारसा प्राणपणाने जपला आहे. परंतु शासकिय उदासिनतेमुळे या आंदोलनाविषयीची माहिती राज्यातील व देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचू शकलेली नाही.
जंगल सत्याग्रह व येथील स्वातंत्र्यसेनानींचा पराक्रम आजही देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. निशस्त्र आंदोलकांनी दिलेल्या लढ्यामुळे इंग्रज सरकारही हादरले होते. परंतु सद्यस्थितीमध्ये चिरनेरमधील स्मारकाची अवस्था फार चांगली नाही. या ठिकाणी सर्व हुतात्म्यांचे भव्य स्मारक असले पाहिजे. सद्यस्थितीमध्ये ग्रामस्थांनी हुतात्म्यांचे शिल्प तयार करून घेतली आहेत. प्रत्येक हुतात्म्याचे योगदान एक वाक्यात लिहून ठेवले आहे. परंतु त्यामुळे आंदोलनाची तीव्रता लक्षात येत नाही. चिरनेरमध्ये पुरातन गणपती मंदिरामध्येच इंग्रजांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. तेथील लोखंडी गजावर अद्याप बंदुकीच्या गोळीचे व्रण दिसत आहेत. स्मारक परिसरामध्ये पुरातण तलाव आहे. हा तलावही मोडकळीस आला आहे. या तलावाचे सुशोभिकरण केले व मंदिरासह स्मृतीस्थळाचा आराखडा तयार करून भव्य स्मारक उभारण्याची गरज आहे. याशिवाय या लढ्याची माहिती पाठ्यपुस्तकामध्ये दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करण्यास मदत होईल अशी अपेक्षा इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत. परंतु शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे हे स्मारकही दुर्लक्षीत राहिले असून अजून किती दिवस ऐतिहासीक ठिकाणाची उपेक्षा होणार असा प्रश्न उपस्थित होत
आहे.
ग्रामस्थांनी जपल्या लढ्याच्या स्मृती
चिरनेरच्या जंगल सत्याग्रहाची योग्य दखल अद्याप शासनाने घेतलेली नाही. परंतु चिरनेर ग्रामस्थांनी मात्र जंगल सत्याग्रहाच्या आठवणी जपल्या आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येकाला नागरिक सत्याग्रहाची माहिती व इंग्रजांनी केलेला गोळीबार याविषयी माहिती देतात. ज्या गावातील भुमिपुत्रांनी रक्त सांडले त्या प्रत्येक गावात हुतात्मा स्मारक तयार केले आहे. अक्काताई जंगलाची सुरवातीच्या ठिकाणीही छोटे स्मारक असून तिथे आता शाळा सुरू आहे. ग्रामस्थ स्मारकाची देखभाल करत असून गावाला पर्यटनस्थळ म्हणून घोषीत करत असल्याची मागणी करत आहेत.
हुतात्मा स्तंभ
चिरनेरमध्ये १३ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जानेवारी १९३२ मध्ये स्तंथ उभारला. परंतू इंग्रज सरकारने जुनमध्ये तो पाडला. पुढे जानेवारी १९३९ मध्ये नामदार बा ग खेर यांच्या उपस्थितीमध्ये स्मृतीस्तंभ पुन्हा उभारण्यात आला. ग्रामस्थांनी या स्तंभाची काळजी घेवून त्याची जपणुक केली आहे.
हुतात्म्यांची नावे : धाकू गवत्या फोबेरकर (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (घाकटी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसुराम बुध्या पाटील (खोपटे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर), आलू बेमटया म्हात्रे (दिघोडे), नारायण कदम (पनवेल), हरी नारायण तवटे, जयराम बाबाजी सावंत, काशिनाथ जनार्दन शेवडे, केशव महादेव जोशी (मामलेदार)
आंदोलकांची राष्ट्रीय स्तरावर दखल
जंगल सत्याग्रहामध्ये अटक करण्यात आलेल्या कैद्यांची नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ठाणे जेलमध्ये जावून भेट घेतली होती. जुलै १९३१ मध्ये या खटल्याचा निकाल लागला तेव्हा स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेथे उपस्थित होते. इंग्रजांनी पाडलेल्या स्तंभाच्या कळस नागरिकांनी वाजत गाजत गावात आणला होता.
अपेक्षित सुधारणा
- तलावाचे सुशोभीकरण
- चिरनेरमध्ये भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे
- आंदोलनाच्या इतिहास पाठ्यपुस्तकात यावा
- पर्यटनस्थळ म्हणून घोषीत करण्यात यावे
- जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची नावे नवी मुंबई, रायगडमधील मोठ्या प्रकल्पांना द्यावी