सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई माहिती व तंत्रज्ञानाचे आधुनिक शहर म्हणून ओळख निर्माण होत चाललेल्या शहरात लॉजिंग-बोर्डिंगचे स्तोम माजले आहे. प्रत्येक विभागात टप्प्याटप्प्यावर असलेल्या लॉजिंगमध्ये दिवसाढवळ्या देहविक्रीचा व्यवसाय चालत आहे. मात्र त्यावर कारवाईत संबंधित प्रशासनाची सोयीस्कर डोळेझाक होत असल्याचे दिसत आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शेकडोच्या संख्येने लॉज चालवले जात आहेत. पूर्वी लॉजसाठी पोलिसांची देखील परवानगी लागायची. मात्र गतवर्षी झालेल्या शासन निर्णयानुसार परवाना प्रक्रियेतून पोलिसांचा हस्तक्षेप काढून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरात लॉजचे स्तोम अधिकच माजले आहे. बहुतांश लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय चालत आहे. त्याकरिता ग्राहकांच्या सोयीच्याच ठिकाणी असे लॉज चालवले जात असून त्यात गावठाण भागांचाही समावेश आहे. यामुळे अनेक गावांना बदनामीची झळ बसत आहे. अशी गावे लॉजचे केंद्रबिंदू म्हणून परिचित होवू लागली आहेत. त्यापैकीच एक असलेल्या जुहूगावात सर्वाधिक लॉज चालत असून काही ठिकाणांवर पोलिसांनी यापूर्वी छापे देखील टाकलेले आहेत. त्याशिवाय नेरुळ, सीबीडी, शिरवणे, तुर्भे, दिघा व एमआयडीसी पट्ट्यातील लॉजमध्ये सर्रास वेश्याव्यवसाय चालत आहे. शहराबाहेरून आलेल्या व्यक्तीला तात्पुरत्या निवासाची सोय म्हणून लॉजिंगची संकल्पना प्रत्यक्षात आलेली आहे. मात्र सध्या लॉजिंगच्या नावाखाली सरसकट अनैतिक धंदे चालत असून त्यासाठी अनधिकृत इमारती देखील उभारण्यात आलेल्या आहेत.परिमंडळ एकच्या उपआयुक्त कार्यालयाभोवतीच मोठ्या संख्येने लॉजिंग चालवले जात आहेत. त्याठिकाणी गतकाळात गुन्हेगारीच्या काही घटना देखील घडलेल्या आहेत. मुंबईच्या एका डॉक्टरने फसवून दुसरे लग्न केलेल्या पत्नीला त्याठिकाणच्या लॉजमध्ये आणून मारण्याचा प्रयत्न केला होता. तर गतमहिन्यात मुंबईचे तरुण-तरुणी तिथल्याच एका लॉजमध्ये आले होते. यावेळी तरुणीने तरुणाला शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना देखील घडलेली आहे. यावरून अविवाहित तरुण-तरुणींना लॉजमध्ये प्रवेश मिळतोच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे लॉजमधील अनैतिक धंद्यांकडे पोलीसच सोयीनुसार डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत जुहूगावातील लॉजवर पोलिसांच्या सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. परराज्यातून देहविक्रीसाठी आणलेल्या मुलींना त्याठिकाणी डांबून ठेवले जात आहे. अशा एका प्रकरणाचा यापूर्वी भांडाफोड देखील झालेला आहे. तर कोपरखैरणेतील एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पिता-पुत्र जुहूगावातीलच लॉजमध्ये लपल्याचे आढळून आले होते. त्यामुळे लॉजचालकांकडून वारंवार कायद्याचे उल्लंघन होत असतानाही त्यांच्यावर परिमंडळ पोलीस कायद्याचा धाक निर्माण करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पनवेल शहरातही आंबेडकर रोड, मार्केट यार्ड, एसटी डेपो अशा ठिकाणी २० हून अधिक लॉज चालवले जात असून दिवसाढवळ्या अनैतिक धंदे चालत आहेत.
लॉजमधील अनैतिक धंद्यांकडे डोळेझाक
By admin | Published: December 22, 2016 6:21 AM